आता गिग कामगारांनाही मिळणार पेन्शनची सुविधा, भारत सरकारकडून लवकरच निर्णय होणार
कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीतून मिळणार सुविधा
28-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : देशातील गिग कामगारांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच एक महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या गिग कर्मचाऱ्यांना लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. यासाठी प्रतिमहिना त्यांच्या पगाराच्या २ टक्के रक्कम यासाठीचे योगदान म्हणून घेण्यात येईल. मुख्य म्हणजे ही रक्कम त्यांच्या पगारातून कापून न घेता त्याची जबाबदारी ही त्या त्या ऑनलाईन सेवा पुरवठा कंपनीची असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान जन आरोग्य योजनेत या गिग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
या योजनेत सध्या ऑनलाईन सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या सर्व कंपन्या म्हणजे स्वीगी, फ्लिपकार्ट, उबेर, ब्लिंकीट यासर्व कंपन्यांचा यात समावेश असणार आहे. या योजनेनुसार या सर्व कंपन्या आपल्याकडील सर्व कर्मचाऱ्यांच्या नावे त्यांच्या पगाराच्या २ टक्के रक्कम या योजनेत गुंतवणार आहे. त्यातून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. एप्रिल महिन्यामध्ये या योजनेचा मसुदा जाहीर होण्याची शक्यता आहे.
भारतात ऑनलाईन सेवा वापराकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता, क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केली जात आहे. त्याबरोबर रोजगार संधीदेखील निर्माण होत आहेत. यामुळे या कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते, याअनुषंगाने हा होत असलेला निर्णय महत्वाचा ठरु शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या गिग कामगारांना ई – श्रम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. या महत्वाच्या निर्णयामुळे या गिग कामगारांच्या संघटनांकडून त्याचे स्वागत होत आहे.