शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्या

Total Views |

डॉ. हेडगेवार
 
मरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
 
गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा या दिवशी सुरू होणारे नवे वर्ष, नवे संवत्सर याबद्दलची भरभरून माहिती आपण दरवर्षीच वाचत, ऐकत, पाहात असतो. साप्ताहिके, दैनिकांच्या साप्ताहिक पुरवण्या गुढीपाडवा या सणाबद्दलची सांस्कृतिक माहिती देणारे लेख छापतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरुनही विविध वाहिन्या हेच काम करतात. शिवाय आता सर्वत्र चांगल्याच रुळलेल्या, नववर्ष स्वागतयात्रांची दृश्ये दाखवत असतात. स्वागतयात्रांचे आयोजक सतत काहीतरी नवनवीन संकल्पना घेऊन शोभायात्रा काढत असल्यामुळे, ही दृश्ये वृत्तांतही अतिशय प्रेक्षणीय असतात. गुढीपाडवा हा हिंदू समाजाच्या अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे, त्या दिवशी धार्मिक कार्यक्रमही पुष्कळ असतात. नव्या घरात प्रवेश, मुलांचे जावळ काढणे, सत्यनारायण पूजा, सोनेखरेदी, नवीन वाहनखरेदी, गुढ्या-तोरणांची सजावट आणि या सगळ्यांच्या निमित्ताने बाजारात भरपूर उलाढाल; म्हणजेच एकंदरीतच प्रत्येक घरासह एकंदर समाजात खूप उत्साह, खूप धावपळ, खूप आनंद या दिवशी ओसंडून वाहात असतो.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात या दिवसाला एक वेगळेच महत्त्व आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी, सुरुवातीपासूनच संघामध्ये कोणत्याही व्यक्तीची पूजा करण्याचा परिपाठ ठेवला नाही. संघामध्ये गुरू म्हणून कुणीही व्यक्ती नाही, तर भगवा ध्वज हाच गुरू आहे. देशभरातल्या सर्व हिंदू समाजाला पूज्य असणारे असंख्य साधु-संत, महापुरुष, महान स्त्रिया; इतकेच नव्हे तर राम आणि कृष्ण यांच्यासारखे दैवी अवतार यांना संघ भारतमातेचे पुत्र-कन्या म्हणून पूज्य मानतो. भारतमाता हे सर्वोच्च दैवत आमि भगवा ध्वज हा गुरू.
 
परंतु, अतिशय निर्दोष अशीही परंपरा ज्यांनी सुरू केली आणि व्यक्तिमहात्म्य या बाधक ठरू शकणार्‍या अवगुणाला थाराच ठेवला नाही, अशा डॉ. हेडगेवारांची काहीतरी आठवण कृतज्ञतेची खूण म्हणूून ठेवणे आवश्यकच होते. त्यासाठी असा प्रघात सुरू करण्यात आला की, वर्ष प्रतिपदेच्या दिवशी ध्वज लागून रीतसर शाखेला सुरुवात होण्यापूर्वी ‘आद्यसरसंघचालकप्रणाम’ दिला जातो. संपूर्ण वर्षभरात डॉ. हेडगेवार या व्यक्तीला प्रणाम करण्याचा हा एकमात्र, एकमेव प्रसंग असतो.
 
शालिवाहन किंवा सातवाहन हा एक अनाथ मुलगा होता. दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान ऊर्फ पैठण या नगरीत, एका कुंभाराच्या कारखान्यात तो हरकाम्या पोर्‍या म्हणून वावरत होता. एका साधूने त्याच्या हातावरील राजचिन्हे पाहून, त्याला संजीवनी विद्या-मेलेल्यांना जिवंत करण्याची विद्या शिकवली. प्रतिष्ठान नगरीवर परकीय आक्रमक शकांची टोळधाड आली, तेव्हा शालिवाहनाने आपल्या मालकाशी बोलणे करून मातीचे सैन्य बनवले. मग संजीवनी मंत्राने त्या सैनिकांना जिवंत केले. ते सैन्य घेऊन तो राजाच्या मदतीला गेला आणि त्यांनी शकांचा पराभव केला. आनंदित झालेल्या राजाने शालिवाहनाला प्रथम सेनापती, मग युवराज आणि शेवटी राज्यपदच दिले. शालिवाहनाने मोहिमांवर मोहिमा काढून शकांना पूर्ण पराजित करून, देशाबाहेर हाकलून दिले. ज्या शक टोळ्यांना भारतातच राहायचे होते, त्यांना त्यांच्या परकीय संस्कृतीचा त्याग करायला लावून हिंदू संस्कृतीचा स्वीकार करायला लावला. हे कार्य नर्मदेच्या तीरावर भृगुकच्छ ऊर्फ भडोच नगरीत बराच काळ चालू होते. अखेर भारत देश ‘शकमुक्त देश’ झाला. ही पुराणकथा प्रसिद्धच आहे.
 
ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. हिंदू समाज मातीसारखाच निष्प्राण, निस्त्राण होऊन पडला होता. कुणीही बलदंडाने यावे आणि मातीप्रमाणेच या हिंदू समाजाला मनसोक्त तुडवावे, लुटावे, मारावे, बाटवावे अशी स्थिती होती. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला. संघटनेनेच सर्व समस्या हळूहळू दूर होतील, ‘संघटन में शक्ती हैं’ हा छोटा मंत्र आणि दैनंदिन संघशाखा हे सोपे तंत्र! ‘मंत्र छोटा, तंत्र सोपे’ निर्माण करून त्यांनी चमत्कार घडवला. विशेष म्हणजे, त्यांचा जन्म वर्ष प्रतिपदेलाच झाला होता. यामुळे डॉ. हेडगेवार हे आधुनिक काळातले शालिवाहनच आहेत, अशा आशयाची मांडणी संघ प्रचारक, कार्यकर्ते, स्वयंसेवक हे नेहमीच करत असतात आणि करत राहतील.
 
यानिमित्ताने आपण हिंदू परंपरेतल्या वर्षप्रतिपदा आणि संजीवनी विद्या यांचा थोडा आढावा घेऊया. वर्षप्रतिपदेला पृथ्वी सूर्याभोवतीची आपली एक प्रदक्षिणा संपवून नव्या प्रदक्षिणेला सुरुवात करते, ही झाली खगोलशास्त्रीय घटना. परंतु त्या दिवशी घडलेली ऐतिहासिक संस्मरणीय घटना म्हणजे, कृष्णाने केलेला कालियाचा पराभव. महाभारत कथेत कृष्ण आहेच, पण मुळात महाभारत हा कौरव-पांडव संघर्षाचा, कुरु नामक वंशाचा इतिहास आहे. कृष्णाचा इतिहास म्हणजे ‘भागवत महापुराण’ किंवा श्रीमद्भागवत.’ एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची हकिकत म्हणजे इतिहास, ही संकल्पना पाश्चिमात्य आहे. त्यामुळे ‘श्रीमद्भागवता’च्या 12 स्कंध म्हणजे प्रकरणांमध्ये असंख्य हकिकती आहेत. पण त्यांपैकी दहाव्या स्कंधात कृष्णाचे समग्र जीवनचरित्र येते. कृष्णाने तान्हे बाळ असतानाच पूतना राक्षसीसह अनेक राक्षसांना ठार केले. तसेच वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मुद्दाम यमुनेत उडी मारून, अत्यंत बलाढ्य अशा कालिया नामक नागाला पराभूत केले. या कथेसह सगळ्याच कृष्णकथांना एक अद्भुताचा स्पर्श आहे. सध्या आपल्या सवयीच्या झालेल्या कथित आधुनिकतेत या अद्भुत कथा बसत नाहीत. पण एक समांतर बालकथा आहे. इ. स. 1663 साली शिवरायांनी शाहिस्तेखानावर घातलेला यशस्वी कमांडो छापा, ही थेट कालियामर्दनाचीच आवृत्ती आहे. मात्र, ही घटना रामनवमीच्या आदल्या दिवशी घडली होती.
 
आता संजीवनी विद्येकडे बघू. भृगु महर्षींच्या अनेक पुत्रांपैकी शुक्राचार्य हे एक होत. हे राक्षसांचे गुरू बनले. भगवान शिवाची उग्र तपस्या करून त्यांनी, याच्याकडून संजीवनी विद्या मिळवली. मग त्यांच्याकडून ती प्राप्त करून घेण्यासाठी, देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कच हा आला. मग कच-देवयानी वगैरे प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीतच आहे.
 
संजीवनीचा यानंतर उल्लेख रामायणात येतो. इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण मृत होतो. तेव्हा वानरांचा वैद्य सुषेण याच्या आदेशानुसार हनुमंत थेेट हिमालयात जातो. संजीवनी सापडत नाही, तेव्हा तो ते द्रोणागिरी नामक अख्खे शिखरच उपटून आणतो. सुषेण संजीवनीच्या प्रयोगाने लक्ष्मणाला जिवंत करतो इत्यादि. आता गंमत पाहा की, इथे संजीवनीला मंत्र न म्हणता ‘वल्ली’ म्हणजे ‘वेल’ म्हटले आहे. सुषेण संजीवनी वल्लीच्या औषधी उपयोगाने लक्ष्मणाला सजीव करतो; संजीवनी मंत्राच्या जपाने नव्हे.
 
आता आपण रामायण काळ, शालिवाहनाचा काळ यातून एकदम आधुनिक काळात येऊ. मुंबईच्या दादर पश्चिम भागात डोंगरेबाग नावाची वाडी होती. आता तिला अमृतकुंभ सोसायटी म्हणतात. तिथे विनायक परशुराम ऊर्फ अप्पाशास्त्री जोशी नावाचे नामांकित वैद्य राहात असत. ते मूळचे पेणचे. किशोरवयातच ते घरदार सोडून हिमालयात गेले. तिथे त्यांना योग्य गुरू मिळाले आणि ते आयुर्वेदात निष्णात झाले. शिवाय, गुरुंनी त्यांना रोग्याच्या नसांना शक्ती देणारी एक विशिष्ट विद्या शिकवली. आजच्या मसाज आणि रेकी या दोन्ही विद्यांचा मिलाप त्या तंत्रात होता, असे म्हणता येईल. विद्या पूर्ण झाल्यावर गुरुंनी त्यांना आदेश दिला की, आता थेट मुंबईत जायचे. तिथे दवाखाना थाटून अतिशय माफक दरात रुग्णसेवा करायची. लग्न करून संसार करायचा आणि गणपतीची उपासना करायची. त्यानुसार पुढील आयुष्यात अप्पाशास्त्री एक नामांकित वैद्य आणि महान गाणपत्य म्हणून प्रसिद्धीस आले. लागोपाठ 21 वर्षे ’मांदार गणेश व्रत’ हे एक कठीण सांप्रदायिक व्रत सपत्निक पाळून, त्यांनी मांदार गणेशाची प्रासादिक मूर्ती प्राप्त केली. याबद्दलची अधिक माहिती आणि मांदार गणेशाचे चित्र पाहायचे असेल, त्यांनी अमरेंद्र गाडगीळ संपादित सुप्रसिद्ध असा ’गणेश कोरा’ अवश्य पहावा.
 
या अप्पाशास्त्रींशी विविध विषयांवर चर्चा करणार्‍या त्यांच्या एका विद्वान मित्राने एकदा त्यांना विचारले, “संजीवनी विद्या किंवा मंत्र किंवा वल्ली हे सगळे खरे आहे का? मृत व्यक्ती जिवंत होणे हे निसर्गाविरुद्ध आहे. मग असे घडू शकते का?” यावर अप्पाशास्त्री उत्तरले, “होय, असे घडू शकते.” सहाजिकच पुढचा प्रश्न ओघानेच आला, “मग अप्पा, तुम्हाला ही विद्या येते का?” अप्पाशास्त्री उत्तरले, “होय, माझ्या गुरुंनी मला ही विद्यादेखील शिकवली आणि सांगितलं की, एखादी व्यक्ती मृत होणं आत्ता उचित नाही. आता ती व्यक्ती जिवंत असणं एकंदर समाजाला आवश्यक आहे, असं पूर्ण विचारांती तुला वाटलं तरच या विद्येचा उपयोग कर. याबाबतीत तुझ्याकडून थोडाही अविचार घडला, तरी सर्वनाश ओढवेल.”
 
आश्चर्याने थक्क झालेल्या मित्राने साहजिकच पुढचा प्रश्न केला, “मग आजवरच्या तुमच्या वैद्यकीय कारकिर्दीत असा प्रसंग तुमच्यावर आलाय का?” थोडा विचार करून अप्पाशास्त्री उत्तरले, “होय, फक्त एकदाच. त्याचं असं झालं की, महान वारकरी संत मामासाहेब दांडेकर हे अत्यवस्थ आहेत, अशी बातमी मला कळली. मी सगळी कामं बाजूला ठेवून पुण्याला गेलो. मामांना भेटलो. त्यांना प्रार्थना केली की, समाजाला तुम्ही अजून हवे आहात. म्हणून या विद्येचा प्रयोग तुमच्यावर करण्याची मला परवानगी द्या. मामांनी आपले तेजस्वी डोळे माझ्यावर रोखले आणि म्हणाले, कशाला माझ्या आणि पांडुरंगाच्या भेटीआड येता? जाऊ द्या मला. मामांची अनुमती नाही म्हटल्यावर, मी त्यांना अखेरचा प्रणाम केला. मुंबईला परतलो आणि माझ्या कामाला लागलो.”
 
मामासाहेब दांडेकर 1968 साली मरण पावले. स्वतः अप्पाशास्त्री 1975 साली मरण पावले. म्हणजेेच संजीवनी विद्या किंवा मंत्र किंवा वल्ली यांचे रहस्य सप्रयोग माहीत असलेला माणूस, आता अगदी 50 वर्षांपूर्वी आपल्यात वावरत होता. भारत हा असा देश आहे की, अशा अद्भुत भासणार्‍या गोष्टींचे ज्ञान असणारी माणसे इथे आजसुद्धा असू शकतील.
 
ती असोत. त्यांचे कार्य ती माणसे करतच असतील. आपणा सर्वसामान्य हिंदू माणसांचे काम आहे, डॉ. हेडगेवारांचा संजीवनी मंत्र जपण्याचे, संघटन में शक्ती है! बटेंगे तो कटेंगे!! एक है तो सेफ है!!!
 
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.