कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यभरातील अनेक महिलांनी लाभ घेतला. परंतू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे.
गुरुवार, २७ मार्च रोजी इचलकरंजी येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "महायूती सरकार निवडून येण्यासाठी लाडक्या बहिणींनी खूप पाठबळ दिले. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. उद्याची पाच वर्षे आपल्या हातात आहेत. आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहिण योजना बंद करणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले.
हे वाचलंत का? - फनेल झोनच्या निर्णयातून मुंबईकरांना मोठा दिलासा! आ. प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
ते पुढे म्हणाले की, "मला थोडी ओढाताण होते आहे, पण मी त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे यात कधी वाढ करायची याचा परिस्थितीनुसार निर्णय घेईल. वर्षाला ४५ हजार कोटी रुपये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देत आहोत. एवढी मोठी रक्कम मार्केमध्ये येत आहे. यातून पुढे बँकांची मदत घेऊन काही चांगले उद्योग करता आल्यास महाराष्ट्रात चांगले काम उभे राहू शकते."