क्रांतिकारी युगपुरुषाच्या भुमिकेत प्रतिक गांधी; 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! जरुर पहा...

    27-Mar-2025   
Total Views |
 
pratik gandhi in the role of a revolutionary era man trailer of the film phule release
 
 
 
मुंबई : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.
 
 
या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'फुले' चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ' फुले' हा हिंदी चित्रपट जगभर ११ एप्रिल २०२५ प्रदर्शित होणार आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.