न ये वर्णिता देवराणा

    27-Mar-2025
Total Views |
n ye varnita devrana


निसर्गाने माणसाला कल्पनाशक्तीचे अपूर्व वरदान दिलेले आहे. त्यामुळे मानव वेगवेगळ्या कल्पनांद्वारा जगातील ज्ञान हस्तगत करीत असतो. तथापि, देहबुद्धी आणि अहंकार यांच्या संगतीमुळे सभोवतालच्या भौतिक गोष्टींचाच विचार व त्यासंबंधी कल्पना करून मानव जगत असतो. मनाला याची सवय झाल्यामुळे सर्व दृश्य वस्तू अशाश्वत असल्या, तरी त्या कल्पनेच्या क्षेत्रात येतात. पंचमहाभूतांनी बनलेल्या दृश्य वस्तू विनाशी असल्याने, माणसाची कल्पना पंचमहाभूतांशी जाऊन थांबते. त्या पलीकडे जाऊन अविनाशी परब्रह्माची कल्पना करू म्हटले, तरी मनाला ते सहजशक्य होत नाही. परब्रह्म, परमात्मा हा पंचमहाभूंताच्या पलीकडील अतींद्रिय ज्ञानाचा विषय आहे. तरीही आपल्या ठिकाणी असलेल्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून, परब्रह्म जाणण्याची दिशा समजू शकते असे स्वामींना वाटते. त्यामुळे यापूर्वीच्या श्लोकात स्वामी म्हणाले की, ‘निर्विकल्पासी कल्पित जावे.’ समर्थ वाङ्मयाचे थोर अभ्यासक शंकरराव देव यांनी आपण सध्या अभ्यासत असलेल्या श्लोक गटाला, तसेच यापुढील 200 पर्यंतच्या श्लोकांना ‘ज्ञानपर श्लोक’ असे म्हटले आहे. यातील ज्ञानाने, अतींद्रिय अनुभूतीची प्रचिती येण्यास मदत होईल. परब्रह्माचा, परमेश्वराचा मार्ग शोधताना ज्या अडचणी येतात, त्यांचा ऊहापोह स्वामींनी पुढील श्लोकात केला आहे.


देहेबुधिचा निश्चयो ज्या टळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना।
परब्रह्म ते मीपणें आकळेना।
मनीं शून्य अज्ञान हें मावळेना॥191॥
समर्थ जेव्हा ‘ज्ञान’ या शब्दाचा उपयोग करतात, तेव्हा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान असा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो, हे स्वामींनी अनेक ठिकाणी स्पष्ट केले आहे. स्वामींनी दासबोधात आत्मज्ञानाचा विषय विस्ताराने कथन केला असल्याने, या श्लोकात स्वामी ‘ज्ञान’ शब्दाचा वापर करतात. श्रोत्यांना ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे माहीत आहे, असे स्वामी गृहीत धरतात. मनाच्या श्लोकांची रचना दासबोधाचे बरेच समास लिहून झाल्यानंतरची असल्याने, श्रोत्यांना ब्रह्मज्ञानाची माहिती आहे असे स्वामींना वाटणे स्वाभाविक आहे. तरीही स्वामींना अभिप्रेत असलेले आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान म्हणजे काय? याचा थोडक्यात आढावा घेऊ. अध्यात्मशास्त्र अभ्यासात ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे शब्द वारंवार ऐकायला मिळतात. आत्मज्ञानप्राप्ती याचा अर्थ ब्रह्मज्ञानाची, अतींद्रियज्ञानाची सूक्ष्म अनुभूती असा करता येतो.

खर्‍या अर्थाने ब्रह्माची सूक्ष्म अनुभूती अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीच जाणू शकतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते अशक्य वाटते. कारण आपण ज्ञानेद्रियांद्वारा दृश्य वस्तूच्या अनुभवाला ज्ञान समजतो. भौतिक वस्तूंचे ज्ञान ज्ञानेंद्रियांनी मिळवण्याची आपल्या मनाला सवय झालेली असते. अर्थातच ते ज्ञान वस्तूंचे रूप, गंध, स्पर्श, नाद श्रवण यावर अवलंबून असते. जगतातील भौतिक वस्तूंचे ज्ञान मिळवून देणारी ज्ञानेद्रियांची पद्धत आणि अतींद्रिय ब्रह्मज्ञान अनुभवण्याची पद्धत, या दोन्ही पद्धती मुळात भिन्न आहेत. नाक, कान, डोळे, त्वचा या ज्ञानेद्रियांद्वारा अथवा अनुमानाद्वारा, परब्रह्माचा अनुभव घेता येत नाही. दृश्य वस्तूंच्या इंद्रियजन्य अनुभवाने आपली देहबुद्धी वाढत जाते. ‘देह म्हणजेच मी’ अशी कल्पना दृढ झाल्याने, माणूस त्यापलीकडील आत्म्याचा विचार करू शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात की, ज्या व्यक्तीला देहबुद्धीचा निश्चय काढून टाकता येत नाही, त्याला आत्मज्ञान या विश्वाच्या अंतापर्यंत कळणार नाही. देहबुद्धी दृढ झालेली माणसे जेव्हा परमेश्वर किंवा परब्रह्म यासंबंधी विचार करू लागतात, तेव्हा त्यांना विपरीत ज्ञान प्राप्त होते. मग ही माणसे परमेश्वर, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान खोटे व काल्पनिक असल्याचा प्रचार करू लागतात. त्यांचे श्रोते देहबुद्धीधारी असल्याने त्यांना हे विचार पटतात. त्यामुळे देहबुद्धी दृढ असणार्‍या अज्ञानी जीवांना आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त होणे सर्वथा अशक्य. तसेच देहबुद्धीचा निश्चय म्हणजेच ‘मीपणा.’ या ‘मीपणा’ने दिखाऊ कल्पना उदय पावून माणसाला वाटते की मी हुशार, मी शक्तिमान, मी बुद्धिमान, मी श्रेष्ठ. ‘मीपणा’ असणारी ही घमेंडखोर माणसे आत्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला क्षुल्लक समजतात. अशा अज्ञानी माणसांना काय म्हणावे? त्यांच्या मनातून अज्ञान जात नाही. वस्तुतः अज्ञान हे मुळात शून्य आहे, म्हणजेच काही नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर अज्ञान शिल्लकच राहात नाही. जसे अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्योदय झाल्यावर अंधार जाणवत नाही, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी शून्यत्व असूनही, ‘मीपणा’ असणार्‍यांच्या ठिकाणचे अज्ञान जाता जात नाही. स्वामी म्हणतात, ‘मनीं शून्य अज्ञान हें मावळेना.’ आता सर्वोत्तमाचे रूप आणि ध्यान कसे अनुभवता येईल, हे स्वामीं पुढील श्लोकात सांगत आहेत,

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें।
तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे।
तेथे संग निसंग दोनी न साहे॥192॥
परमात्मस्वरूप अर्थात ब्रह्मस्वरूप अतींद्रिय ज्ञानाचा विषय असल्याने, मनाला ते रूप समजत नाही. परंतु मनाला समजत नाही, म्हणून ते नाही असे मात्र म्हणता येत नाही. परमात्मस्वरूप हे अढळ आहे, अविनाशी आहे. त्यात बदल संभवत नाही. मनाला ते पाहता येत नाही. कारण मनाला दृश्यवस्तूच पाहण्याची सवय असते. दृश्यवस्तू आपल्यापासून वेगळी असल्याने, ती पाहाणे मनाला सोपे जाते. परमात्मस्वरूपाचा विचार करता, तेथे पाहणारा आणि पाहाण्याची, अनुभवण्याची वस्तू एकच असल्याने, मनाला ती वेगळेपणाने पाहता येत नाही. परमात्मस्वरूप अतिसूक्ष्म असल्याने, ध्यानात त्या रूपाशी एकरूप होऊन ते अनुभवणे शक्य असते. बरं ते रूप दाखवण्यामागची अडचण अशी की, दुसर्‍या वस्तूचा दृष्टान्त देऊन ते दाखवता येत नाही. कारण अतींद्रिय, सूक्ष्म परमात्मरूप दाखवण्यासाठी दृष्टान्त म्हणून दुसरी वस्तू घ्यावी, तर दुसरी वस्तू कमी दर्जाची असल्याने तो हीन दृष्टान्त ठरतो. परमात्मवस्तू आहेपणाने किंवा नाहीपणानेही दाखवता येत नाही. तेथे संग आणि निःसंग या दोन्ही कल्पना उपयोगी पडत नाहीत. परमात्मा आसक्त आणि अनासक्त या दोहींच्या पलीकडे आहे. मग हा देवराणा आहे तरी कसा? ‘अरुपाचे रूप दावीन” अशी प्रतिज्ञा करून, ज्ञानेश्वर माऊली त्याचे वर्णन करण्यासाठी नऊ हजार ओव्यांचा प्रपंच ज्ञानेश्वरीत मांडतात. तोच आशय स्वामी पुढील श्लोकात सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नव्हे जाणता नेणता देवराणा।
न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां।
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥193॥
भौतिकातील दृश्य वस्तूंचे ज्ञान रंग, रूप, रस, गंध, आकार यांनी होत असते. परंतु, देवराणा हा ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे आहे. दृश्य वस्तूंचे वर्णन करणे सोपे असते. तथापि, परमात्मा दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. त्यामुळे वेद, शास्त्रे, पुराणे परब्रह्माचे वर्णन करूच शकत नाहीत. वेदांनाही परमात्मस्वरुपाचा अंत सापडत नाही. त्या रूपाचे वर्णन करताना वेद ‘नेती नेती’ असे सांगतात. परब्रह्माचे वर्णन वेदांनाही करता आलेले नाही. सामान्य माणूस परब्रह्म अथवा परमात्मा यांबद्दल ज्या कल्पना करतो, त्या सार्‍या मानवी मनाच्या द्योतक असतात. त्या कल्पना पूर्णपणे सोडून दिल्यावर जी शुद्ध जाणीव उरते, त्यातूनच परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो, अन्यथा वेदांनाही जे सांगता आले नाही, ते केवळ शब्दांनी संगणे सर्वथा अशक्यप्राय आहे. तरीही अंतःकरणातील देवाचा प्रश्न साधकाने उपस्थित केल्याने देह सोडल्यावर त्या देहाचे काय होते, यावर स्वामी पुढे चर्चा करणार आहेत. (क्रमशः)
 

सुरेश जाखडी
7738778322