डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'जयभीम पँथर – एक संघर्ष' चित्रपटाच्या गाण्यांचा भव्य लोकार्पण सोहळा!

27 Mar 2025 19:26:18



grand launch ceremony of songs from the film Jai bhim panther ek sangharsh on the occasion of dr. babasaheb ambedkar jayanti



मुंबई : ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'जयभीम पँथर – एक संघर्ष' या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतेच करण्यात आलं. याप्रसंगी निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा भीमराव आंबेडकर साहेब, सिद्धार्थ कासारे, मा. सागर संसारे, मिलिंद शिवशरण, संजय भाऊ खंडागळे चित्रपटातील कलाकार आणि प्रोजेक्ट हेड संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील, कलादिग्दर्शक प्रकाश सिंगारे आवर्जून उपस्थित होते.अत्यंत संवेदनशील आणि दमदार गाणी या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.
 
 
भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला "जयभीम पँथर" एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील आणि कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिंगारे यांनी काम पाहिले आहे.
 
 
चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून चित्रपटात २ गीते आहेत ज्याचे लेखन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे.'माझ्या भीमाची जयंती' हे गीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे तर 'जयभीम घोष होऊ दे' हे गाण अजय देहाडे, शुभम म्हस्के यांचा सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी वेगवेगळी गाणी तयार केली जातात. आता 'जयभीम पँथर – एक संघर्ष' या चित्रपटाची ही दोन नवी गाणी चळवळीला मिळणार आहेत.
 
 
'जयभीम पँथर – एक संघर्ष' मध्ये गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे आणि प्रियांका उबाळे यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका आहेत. बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष हा या चित्रपटाचा आशय आहे. समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होते, यांची रंजक गोष्ट या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.




Powered By Sangraha 9.0