नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा, अशी मागणी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवारी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन,समाजामध्ये दुफळी पसरते. या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा, अशीही मागणी खासदार उदयनराजे यांनी यावेळी केली आहे.
ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी, जेणेकरुन संभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल, असेही खासदार उदयनराजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
औरंगजेबाची कबर एएसआय यादीतून काढा – खासदार राहुल शेवाळे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी यासाठी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची गुरुवारी दिल्लीत भेट घेतली. केंद्र सरकारच्या वतीने सोबतच खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून बाहेर काढण्यात यावी,अशी मागणी त्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.