मुंबई : मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, आणि लातूर जिल्ह्यातील उबाठा गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला असून यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, सचिव संजय म्हशीलकर, उपनेत्या आशा मामेडी, वरळीचे विभागप्रमुख दत्ता नरवणकर, प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते संजीव भोर पाटील आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हे वाचलंत का? - दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं! म्हणाले, "त्या विषयावर..."
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षात शिवसेना आणि महायूतीच्या माध्यमातून केलेले काम आपल्या समोर आहे. या अडीच वर्षात अनेक विकासाचे प्रकल्प आणल्याने महाराष्ट्रातील जनतेने दैदिप्यमान यश दिले आणि विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनवण्याइतकेही संख्याबळ ठेवले नाही. काम करणाऱ्या लोकांकडे लोक येतात आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात. हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून नोकर मालकाचा पक्ष नाही," असा टोला त्यांनी यावेळी लगावला.