रस्त्यावर नमाज अदा केल्यास पोलीस घेणार कठोर भूमिका
27-Mar-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठमधील रमजान (Ramdan) महिन्याच्या अंतिम उपवासाचा दिवस हा २८ मार्च आहे. मेरठ पोलीस प्रशासनाने रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी उपवासाला घेऊन एक कठोर भूमिका घेतली आहे. यावेळी रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने म्हटले की, असे असूनही जर कोणी रस्त्यावर नमाज पठण करताना आढळले तर त्या संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आदेश दिले जातील. त्याचा पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाऊ शकतो. मेरठ पोलिसांच्या या निर्णयाला मुस्लिम समुदायाने विरोध दर्शवला आहे.
रस्त्यावर नमाज अदा केल्यास कडक कारवाईचा इशारा मेरठ पोलिसांनी दिला आहे. जर कोणी रस्त्यावर नमाज अदा केली तर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर आता त्यांचा पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मेरठचे एसपी सिटी आयुश विक्रम सिंहांनी माहिती दिली की, मागील प्रकरणातही रस्त्यावर नमाज अदा केल्याबद्दल २०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळीही जर कोणी असेल तर त्याच्यावरही कडक कारवाईचे आदेश दिले जातील असे त्यांनी सांगितले आहे.
एसपी सिटी आयुष विक्रम यांच्या मते, ईद दिवशी सर्व नेते आणि इतर इमामांना आवाहन करण्यात आले आहे की, लोकांनी फक्त मशिदी किंवा ईदगाहमध्येच नमाज अदा करावी, या निर्णयानंतर मुस्लिम समुदायाने आक्षेप घेतला आणि म्हटले की जर बंदी घातली तर ती सर्वांसाठी समान असली पाहिजे आणि केवळ मुस्लिम समुदायाला लक्ष्य केले जाऊ नये.
दरम्यान, ईद आणि नवरात्रसारख्या आगामी सणांबाबत संबळमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संभलचे सीओ अनुज चौधरीही उपस्थित होते.