मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muslim Areas Rename) मुस्लिम परिसरांची नावे बदलून ती पुन्हा हिंदूंच्या नावे करण्यात यावी अशी मागणी वाराणसीतील हिंदू हक्क संघटनांकडून करण्यात आली आहे. जगतगुरु रामभद्राचार्यंच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान या नामांतराच्या विषयावर त्यांनी समर्थन दर्शवल्याने वाराणसीत सध्या या मुद्द्यावरून चर्चा सुरु आहे. येथील औरंगाबाद परिसराचे नाव बदलून लक्ष्मीनगर किंवा नारायणी धाम नगर करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय अद्याप महापालिका कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेला नाही.
विश्व वैदिक सनातन न्यासने दि. २० मार्च रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून औरंगाबाद परिसराचे नाव बदलण्याची मागणी केली होती. २४ मार्च रोजी बनारस हिंदू विद्यापीठात यासंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान जगतगुरु रामभद्राचार्य यांनी इस्लामिक धर्मांध आणि आक्रमकांशी संबंधित सर्व नावे बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. वाराणसीमध्ये ५० हून अधिक परिसर आहेत ज्यांची नावे मुस्लिम नावांवर आहेत. ही नावे बदलण्यात यावीत, यावर हिंदू कार्यकर्त्याने भर दिला असून त्यांनी वाराणसी महापालिकेच्या महापौरांना पत्रही दिले आहे.
यामध्ये मदनपुरा गोल चबुतरा याला सिद्ध पीठ/सिद्ध महाल असे नाव द्यावे, असे ते म्हणाले. खलीसपुराचे नाव बदलून ब्रह्मेश्वर महाल किंवा ब्रह्मतीर्थ ठेवावे. त्याचप्रमाणे गोलगडाचे नाव बदलून विश्वकर्मा नगर किंवा विश्वकर्मा तीर्थ, पीलीकोठीचे नाव बदलून स्वर्ण तीर्थ, कज्जकपुरा/सरैयाचे नाव अनरस तीर्थ, अंबिया मंडीचे नाव अमरेश्वर तीर्थ आणि चौखंबा असे ठेवावे. आंबिया मंडीला कागदपत्रांमध्ये अमीरचंद या मुस्लिम नावाने ओळखले जाते, ते देखील बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक