मुंबई: ( JNPA to set up corporate office at Malet Port ) मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा ‘जनेप’ने केली आली. ‘जनेप प्राधिकरणा’चे अध्यक्ष आणि ‘वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड’चे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार, दि. २५ मार्च रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी ‘जनेप प्राधिकरणा’ला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘जनेप’ प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि ‘वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड’चे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ म्हणाले, “वाढत्या व्यापार मागणीला तोंड देण्यासाठी आम्ही आमच्या पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत. उत्कृष्टतेसाठीचा ‘जनेप प्राधिकरणा’चा दृष्टिकोन बंदरांच्या कामकाजाच्या पलीकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीपर्यंत असा विस्तारित आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक हजार कोटी रुपये
या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक हजार कोटी रुपये असेल. या इमारतीची रचना ४.० ‘एफएसआय’सह केली जाणार आहे. तसेच, बांधकाम क्षेत्र सुमारे नऊ लाख चौरस फूट असेल. ‘जनेप प्राधिकरणा’ने तपशीलवार रचना, अभियांत्रिकी, बांधकाम आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवांसह प्रकल्प उभारणीच्या संपूर्ण सल्लामसलतीसाठी ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ (ईआयएल)ची नियुक्ती केली आहे.
वाढवण कौशल्य विकासासाठी 21 हजार तरुणांचा प्रतिसाद
अलीकडेच सीमाशुल्क दस्तऐवजीकरण अभ्यासक्रमासाठी एक अभिमुखता कार्यक्रम पालघर येथे आयोजित करण्यात आला होता. सीमाशुल्क प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात आपले ज्ञान वाढवण्यासाठी उत्सुक असलेल्या २१ हजारांहून अधिक तरुणांचा प्रतिसाद मिळाला.
अशी असेल इमारत
‘जनेप प्राधिकरण’ २० पेक्षा जास्त मजल्यांची प्रतिष्ठित उंच इमारत विकसित करण्याची योजना आखत आहे. प्रस्तावित कॉर्पोरेट कार्यालयाची जागा फेरी व्हार्फ आणि डोमेस्टिक क्रूझला लागून असलेल्या मालेट बंदर रोडवर आहे. ‘मुंबई बंदर प्राधिकरणा’ने (एमबीपीए) ‘जनेप प्राधिकरणा’ला १२ हजार, ८०४ चौरस मीटर (३.१६ एकर) भूखंड लीजवर देण्याचे मान्य केले आहे. या इमारतीत ‘जनेप प्राधिकरणा’चे कॉर्पोरेट कार्यालय, इमारतीत नौवहन महासंचालक, ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ (आईपीजीएल) आणि ‘इंडियन पोर्ट रेलंड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड’ (आईपीआरसीएल) सारख्या बंदर संलग्न संस्थांची कार्यालये, डिजिटल वेधशाळा आणि तळमजल्यावर दोन हजार आसन क्षमतेचे सभागृह असेल.