बंगळुरु : भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी असलेल्या इन्फोसिस कडून कर्मचारी कपातीचा सिलसिला कायम राहिला आहे. कंपनीच्या बंगळूरु येथील प्रशिक्षण केंद्रातून ४५ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. अंतर्गत मुल्यमानात हे प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे कारण कंपनीने दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात ३५० प्रशिक्षणार्थींना काढून टाकल्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये इन्फोसिसकडून असेच ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. त्याही वेळी हे कर्मचारी अंतर्गत मुल्यमापनात अनुत्तीर्ण झाले हेच कारण दिले गेले होते. याउलट प्रशिक्षणार्थींकडून या अंतर्गत मुल्यमापनाची काठिण्य पातळी सर्वसाधारण पातळीपेक्षाही जास्तच आहे असे सांगण्यात आले आहे . त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुनसुध्दा त्या कर्मचाऱ्यांना नोकरीस मुकावे लागत आहे. ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकरीची अडीच वर्षे पूर्ण केली होती. या गोष्टींबाबत इन्फोसिस कंपनीच्या कर्मचारी संघटनांकडून विरोध केला जात आहे.
इन्फोसिस कडून नुकत्याच काढलेल्या या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेंतर्गत भरती करुन घेण्यात आले होते. यामध्ये प्रति महिना ९ हजार इतके विद्यावेतन मिळते. ही भरती वर्षभरासाठी असूनही या कर्मचाऱ्यांना चारच महिन्यांत कामावरुन काढून टाकण्यात आले, कित्येकांना त्यांना त्या प्रशिक्षणात निगेटिव्ह मार्किंग मिळाले आहे याबद्दल काहीच कल्पना देण्यात आलेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
इन्फोसिस कंपनीकडून या सर्व आरोपांचा इन्कार करण्यात आलेला असून कंपनीला त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अधिक चांगले आणि उच्च गुणवत्ता असलेले कर्मचारी हवे आहेत, त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाची पातळी अधिक कठिण करण्यात आली आहे. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही त्यांनाच कंपनीने काढून टाकले आहे. असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.