एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. यामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आयपीओचा. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ कायमच गुंतवणुकदारांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरत असतात. याच आयपीओ मार्केटमधील घडामोडी आपल्याला काय सांगतात हे बघूया.
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. कुठल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले म्हणजे आपल्याला फायदा होईल हा सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असतो. यामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आयपीओचा. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ कायमच गुंतवणुकदारांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरत असतात. आज बघूया या २०२५ या आर्थिक वर्षात कुठले आयपीओ येण्याची शक्यता आहे, त्यांची किंमत काय असू शकते आणि या मार्केटमध्ये प्रभाव टाकणारे कुठले घटक महत्वाचे ठरु शकतात ते.
पहिले बघूया की २०२४ हे वर्ष भारतातील आयपीओ मार्केटमध्ये आले आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळाला ते. एका प्रसिध्द वृत्तपत्राच्या अहवालानुसार २०२४ हे वर्ष आयपीओ मार्केटसाठी ब्लॉकबस्टर ठरले. या वर्षी आलेल्या आयपीओंमधून १ लाख ६० हजार कोटी इतकी रक्कम उभी राहिली होती. एवढ्या प्रतिसादाने भारताने आपलाच २०२१ सालचा १ लाख १८ हजार कोटींचा रेकॉर्ड मोडला. २०२४ मध्ये भारत अमेरिकेनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयपीओ बाजारपेठ ठरला. एकट्या ऑक्टोबर २०२४ मध्ये ३८७०० कोटी इतकी मोठी रक्कम आयपीओ विक्रीतून उभी राहिली. या आयपीओमध्ये ह्युंदाई, वारी एनर्जी हे दोन महत्वाचे होते. यातील ह्युंदाई कंपनीचा २७८७० कोटींचा आयपीओ हा सर्वात मोठा आयपीओ होता. २०२४ मध्ये जागतिक बाजारात झालेल्या उलथापालथींनंतरही भारताने आपली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम राखल्याने त्याचा फायदा आयपीओनासुध्दा झाला होता. कोरोना काळातील धक्क्यातून सावरत भारतीय बाजार आपल्या पूर्वपरिस्थित येत असल्याचेच ते निदर्शक होते असे या अहवालात म्हटले आहे.
२०२५ मध्येही हाच ट्रेंड कायम राहणार असला तरी त्याबाबत काही शंका तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असलेली जागतिक पातळीवरची अशांतता याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबरीने काही महत्वाचे मुद्देही लक्षात घेणे गरजेचे आहे. मंदावलेले मागणीचे चक्र, त्याच्या जोडीला अमेरिकेकडून आयातशुल्क लादणे, खनिज तेलाच्या किंमती, तसेच रुपयाची किंमत घटणे, डॉलरची किंमत वाढणे, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरांमध्ये होत असलेला धरसोडपणा यासर्वच गोष्टी भारतीय शेअर बाजारावर प्रभाव टाकत आहेत. त्यांचा परिणाम यावर्षी येणाऱ्या आयपीओंवर होणार असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे यावर्षीच्या दुसऱ्या तिसऱ्या तिमाहीत सुधारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये काही महत्वाच्या क्षेत्रातील आयपीओनाच मागणी येण्याची शक्यता आहे.
भारतातील स्टार्टअप क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार यावर्षी ४३ नवे आयपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. यामधील प्रमुख कंपन्या म्हणजे ओयो कंपनी स्वत:चा आयपीओ आणणार आहे. हा आयपीओ ६,६८० कोटींचा असणार आहे. त्यानंतर पाईन लॅब्स ८७०० कोटींचा आयपीओ आणणार आहे. झेप्टोकडून ३९१५ कोटींचा आयपीओ, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील प्रसिध्द कंपनी बोट कडून २००० कोटी, लेन्सकार्टकडून ८७०० कोटींचा आयपीओ आणण्यात येणार आहेत. याशिवाय फ्लिपकार्ट, बिरा, इनोव्हिटी, इंफ्रा मार्केट, शेअर्ड ऑफिस स्पेस या व्यवसायातील अग्रगण्य कंपनी असलेल्या वी वर्क यासर्व कंपन्यांचे आयपीओ येणे प्रस्तावित आहे. हे सगळे आयपीओ बघितले की आपल्या लक्षात येते की प्रामुख्याने सेवा क्षेत्रातील आयपीओ जास्त येताना दिसत आहेत. यामुळे ते क्षेत्र गुंतवणुकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. ही झाली कुठले आयपीओ येणार आहेत त्याची माहिती. आता बघूया कुठले महत्वाचे मुद्दे यावर्षी येणाऱ्या आयपीओंवर प्रभाव टाकू शकतात.
आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर या संस्थेकडून याबद्दल एक सविस्तर अहवाल प्रकाशित झाला आहे. या प्रभाव टाकणाऱ्या मुद्यांमधील पहिला मुद्दा आहे. शेअर बाजारातील मुल्यवर्धन हा आहे. सध्या आपल्याकडे शेअर बाजार हा तेजी मंदीच्या हिंदोळ्यांत अडकला आहे. पण लवकरच ही परिस्थिती बदलून त्यात स्थिरता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होईल आणि गुंतवणुक दारांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रातील कंपन्यांचा वाढता प्रतिसाद. कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार तसेच गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार आहेत त्यामुळे या संधींचा फायदा घेण्यासाठी मोठी गुंतवणुक गुंतवणुकदारांकडून होण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे हा मुद्दा प्रभावशाली असू शकतो. आयपीओ मार्केट पुन्हा एकदा स्थिरावत आहे. हा सुध्दा महत्वाचा प्रभावशाली मुद्दा असू शकतो. कोरोना काळानंतर भारताची तसेच जागतिक अर्थव्यवस्था स्थिरावत आहे. यात भारतात झालेल्या सार्वत्रिक तसेच राज्य निवडणुकांमध्ये आलेल्या सरकारांनी गुंतवणुक वाढीकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केल्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात देण्यात आलेली करसवलत. या करसवलतीमुळे देशातील मध्यमवर्गाकडून खर्चाला चालना मिळेल आणि त्यातून देशात मागणीवाढीचे चक्र पुन्हा वेग धरेल अशी अपेक्षा उद्योगजगताकडून केली जात आहे. यापुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खासगी गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता. २०२४ या वर्षापासून देशातील खासगी क्षेत्राकडून गुंतवणुक मंदावल्याचे चित्र तयार झाले होते. पण सरकारने पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा क्षेत्रांत गुंतवणुक केली आहे. याचा परिणाम म्हणून खासगी क्षेत्रही लवकरच गुंतवणुक करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता आहे.
हे सर्व मुद्दे बघितले तर आता भारतात खरोखरीच गुंतवणुक योग्य वातावरण तयार होत आहे. मोठ्या प्रमाणावर येणारे आयपीओ हेच सांगत आहेत. तेव्हा आता गुंतवणुकदारांनी याचा फायदा कसा करुन घेता येईल याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे.