नवी दिल्ली: ( Former ED chief sanjay kumar mishra in PM Economic Advisory Committee ) केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
सरकारने मंगळवार, दि. २५ मार्च रोजी रात्री उशिरा हा आदेश जारी केला. केंद्र सरकारने जारी केलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे की, “१९८४ च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी मिश्रा हे पंतप्रधानांच्या संमतीनंतर पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करणार आहेत.
मिश्रा यांची नियुक्ती भारत सरकारच्या सचिवपदावर आणि वेतनावर करण्यात आली आहे, जी पुन्हा नियुक्त झालेल्या सरकारी अधिकार्यांना लागू असलेल्या नेहमीच्या अटी आणि शर्तींनुसार आहे. पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी भारत सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आर्थिक आणि संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी स्थापन केली आहे.”