स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत 50 हजार रूपयांच्या वैविध्यपूर्ण चलनी नोटांचा संग्रह करणारे रणछोडदास भुतडा यांच्याविषयी.....
असं म्हणतात की, जीवनाची वाटचाल करत असताना प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. काहीजणांना त्याचे महत्त्व लक्षात येत नाही आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीजण मात्र आपल्यातील छंदाचे स्वरूप नेमकेपणाने ओळखून, तो जोपासण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. गायन, वादन, नृत्य, चित्र आदिंचा समावेश असलेल्या ज्या 64 कला आहेत, तसेच काही क्रीडाप्रकारही आहेत. त्याव्यतिरिक्त दुर्मीळ वस्तूंचा संग्रह, पुरातन काळातील नाणी, टपाल तिकिटे, चलनातील नोटा गोळा करणे असे नानाविध छंदाचे प्रकार आहेत. आणि हे छंद जोपासताना त्या व्यक्तींना जी आत्मिक समाधानाची तसेच अभिमानाची अनुभूती मिळते, ती शब्दांत व्यक्त करता येत नाही. त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटल्यावरच त्याची प्रचिती येते. रणछोडदास भुतडा हे त्यांपैकीच एक नाव.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंत, वैविध्यपूर्ण निवडक चलनी नोटांचा त्यांनी संग्रह केलेला आहे. आपल्या संग्रहातील प्रत्येक नोटेविषयीची माहिती देताना त्यांच्या चेहर्यावरील हावभाव, त्यांच्यातील आत्मानंद अधोरेखित होत जातो. त्यांच्या संग्रहातील नोटा पाहिल्यानंतर एक लक्षात येते की, दैनंदिन जीवनात आपण अनेक चलनी नोटा हाताळतो, खरेदी-विक्री व्यवहारासाठी त्याचा उपयोग करतो. परंतु, हे व्यवहार करताना नोटांकडे बारकाईने पाहात नाही, लक्ष देत नाही. फार झाले, तर फाटकी अथवा चुकून म्हणा किंवा जाणूनबुजून कोणी नकली नोट आपल्याला दिली, तरच आपण त्या नोटेकडे बारकाईने पाहतो, नाहीतर तिकडे फारसे लक्ष देत नाही. रणछोडदास भुतडा मात्र याबाबत विलक्षण सतर्क असतात. हाती आलेल्या नोटेमध्ये वेगळेपण शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांना ती एक सवयच जडलेली आहे आणि या सवयीतूनच वैविध्यपूर्ण नोटा जमा करण्याचा त्यांना छंद जडला. आजघडीला जवळपास 50 हजार रुपयांच्या वैविध्यपूर्ण नोटा त्यांच्या संग्रही आहेत. विशेष म्हणजे, केवळ आणि केवळ आत्मिक समाधानासाठी त्यांनी हा छंद जोपासला आहे.
सध्या पुण्याजवळील पिंपळे-सौदागर या उपनगरात वास्तव्यास असलेले रणछोडदास मूळचे सोलापूरचे. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला. ग्लास आणि अॅल्युमिनियम विंडो विक्री करणे हे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायानिमित्त भारताच्या अनेक शहरांतील व्यापार्यांशी, त्यांचा संपर्क असायचा. दैनंदिन व्यवहारात पैशांची देवाणघेवाण व्हायची आणि यातूनच रणछोडदास भुतडा यांना विविध प्रकारच्या चलनी नोटा गोळा करण्याचा छंद जडला. काँग्रेसच्या नेत्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात, एक हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणली होती. ती बंदी घातलेली एक हजार रुपयांची नोट रणछोडदास यांनी अजूनही जपून ठेवली आहे. शिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळात निजामकालीन नोटा, ‘खादी ग्रामोद्योग कमिशन’तर्फे छापलेल्या मोजक्या नोटाही त्यांच्या संग्रही आहेत.
पूर्वीच्या काळी 100 रुपयांची नोट आकाराने थोडी मोठी असायची. त्या नोटेला ‘फाफडा नोट’ म्हणायचे. ती नोटही त्यांच्या संग्रही पाहायला मिळते. साधारणपणे नोटांवर महात्मा गांधी यांची प्रतिमा पाहायला मिळते. रणछोडदास यांच्याकडे असलेल्या नोटांवर निजामकालीन राजा, सिंह, वाघ, समुद्रातील जहाज, हत्ती, धरण, वेरुळची लेणी, संसद भवन आदि प्रतिमाही पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त सीरिजमधील पहिली नोट, शेवटचा क्रमांक असलेली नोट, एक ते दहा क्रमांकाच्या नोटा, सेम सीरिजच्या पहिल्या दहा नोटा, मुस्लीम समाजात शुभ समजल्या जाणार्या 786, तसेच जैन समाजातील 1007, 1008 या क्रमांकाच्या नोटा, नंबर नसलेली नोट, चुकीचे डिझाईन छापलेली नोट, अर्धवट छापलेली नोट, एक भाग संपूर्ण कोरी असलेली नोट, जुनी बाद झाल्यानंतर पुन्हा चलनात आलेली नोट (अशा नोटांवर स्टारची खूण असते), महात्मा गांधींची प्रतिमा नसलेली नोट, चढता क्रमांक असलेल्या तसेच उतरता क्रमांक असलेल्या नोटा अशा स्वरुपातील वैविध्यपूर्ण चलन, रणछोडदास यांच्या संग्रही आहे. त्या नोटांवर ज. भ. कृपलानी, एस. जगन्नाथ, के. आर. पुरी, एस. वेंकटरमण, आय. जी. पटेल, रा. ना. मल्होत्रा, सी. रंगराजन, सुब्बाराव रेड्डी, अर्जित पटेल, विमल जालान, शक्तिकांत दास, निर्मलचंद्र सेनगुप्ता, रघुराम राजनपर्यंत गव्हर्नर साहेबांच्या स्वाक्षरी आहेत. अशाप्रकारे अतिशय दुर्मीळ आणि वैविध्यपूर्ण चलनी नोटांचा संग्रह करणारे रणछोडदास भुतडा गेल्या दहा वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास असून, पिंपळे-सौदागर येथील ‘ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन’चे ते सदस्य आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाला, गिरीश चडचणकर या सोलापुरातील सराफा व्यापारी यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळालेले आहे. आता त्यांचा मुलगा नीरज भुतडा हा देखील, रणछोडदास यांच्या छंदाला हातभार लावत आहे. वडिलांचा दुर्मीळ चलनी नोटा संग्रह करण्याचा छंद जोपासण्यासाठी, तोदेखील प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या रंजक प्रवासास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क) : 9075410007.