नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामाचे नियोजन करा! अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

    27-Mar-2025
Total Views |
 
Abhijit Bangar
 
मुंबई : नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या नियोजन नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. तसेच गाळ काढण्‍याची कार्यवाही अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे होण्यासाठी दुय्यम अभियंता तसेच सहायक अभियंत्यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी पूर्ण वेळ उपस्थित रहावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
 
मंगळवार, दिनांक २५ मार्च २०२५ पासून पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान, गुरुवार, २७ मार्च रोजी बांगर यांनी पूर्व उपनगरांमध्‍ये सुरु असलेल्या नालेस्वच्छता कामांची पाहणी केली. यात शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द नाला, देवनार नाला, लक्ष्‍मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍ता (जेव्‍हीएलआर) येथील कल्‍वर्ट, भांडुप येथील दयानंद अँग्‍लो वेदिक (डिएव्‍ही) महाविद्यालय नाला, स्‍वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नाला, एपीआय नाला आणि उषा नगर नाला इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला.
 
हे वाचलंत का? -  स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे मुख्य सचिवांना पत्र; पुणे पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
 
यावेळी ‘एम पूर्व’ विभागाच्‍या सहायक आयुक्‍त अलका ससाणे, ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त भास्‍कर कसगीकर, पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाचे उपप्रमुख अभियंता सचदेव हरदीपसिंग यांच्‍यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
 
३१ मे २०२५ पर्यंत नाले स्‍वच्‍छतेची कार्यवाही पूर्ण करा
 
“मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळ काढण्‍याची कार्यवाही अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे होण्‍यासाठी दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंता यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी पूर्ण वेळ उपस्थित राहावे. गाळ काढण्‍याच्‍या कामाचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. संगणकीय प्रणालीमध्‍ये दररोज अद्ययावत माहिती भरावी. तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत नाले स्‍वच्‍छतेची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले. यासोबतच मेट्रो रेल्‍वे तसेच मध्‍य रेल्‍वे व्‍यवस्‍थापनाशी समन्‍वय साधून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्‍वास न्‍यावी. नाल्‍यांमधील सांडपाण्‍याच्‍या पृष्‍ठभागावर वाहणारा आणि तरंगणारा घनकचरा विशेषत: प्‍लास्‍टिक कचरा रोखण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या ठिकाणी जाळ्या बसवाव्‍या,” असेही त्यांनी दिले.