बीड : (Santosh Deshmukh Case Hearing) संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दि. २६ मार्च रोजी बीड सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. तसेच वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितले. वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच युक्तिवाद करताना सुरुवातीलाच वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी कशाप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यामागील कारणं तसेच गुन्ह्याशी संलग्न असलेल्या घटना या सगळ्याचा सविस्तर तपशील न्यायालयासमोर मांडला आहे. २९ नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या केज येथील कार्यलयात बैठक झाली होती. त्यावेळी संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात आडवे येत असल्याची चर्चा झाली. आणि यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.
उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना काय म्हटलं?
"१ डिसेंबरला तिरंगा हॅाटेलमध्ये वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली होती. सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडने गाईड केले. वाल्मिक कराडने गाईड केल्याचे सीडीआर तपासामधून समोर आले आहे. तसेच कृष्णा आंधळेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला फोनकॅाल्स केले होते. या टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले तर हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे" असे वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\