मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या हटके विनोदशैलीने लोकप्रिय झालेली अभिनेत्री नम्रता संभेराव ही केवळ हास्यकलाकार नाही, तर ती एक संवेदनशील अभिनेत्री देखील आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात तिने आपल्या मुलासोबत घडलेला एक खास प्रसंग शेअर केला, ज्याने तिच्या अभिनयाच्या ताकदीची जाणीव तिला झाली.
नम्रताने आपल्या मुलाला एकदा ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाच्या प्रयोगाला नेले होते. पण मध्यंतरातच तो तिच्याकडे धावत आला आणि रडत म्हणाला, “आई, तू नाटकात काम करु नकोस!” यावर आश्चर्यचकित झालेल्या नम्रताने त्याला विचारले असता तो म्हणाला, “आई, मी तुला रडताना पाहू शकत नाही.” त्यावेळी तो अवघा चार वर्षांचा होता.
या अनुभवाविषयी बोलताना नम्रता म्हणते, “माझ्या मुलाला मी केलेला अभिनय इतका खरा वाटतो, त्याला त्याबद्दल भावना आहेत, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हा माझ्या कामाचा खरा सन्मान आहे.”मुलाच्या भविष्यातील योजना आणि मनोरंजन क्षेत्रात येण्याबद्दल नम्रता म्हणते, “तो या क्षेत्रात येईल की नाही, हे मी आत्ता ठरवत नाही. पण त्याला इच्छाशक्ती असेल, तर मी नक्की मार्गदर्शन करेन.” नम्रता संभेराव हिची ही कथा सिद्ध करते की, तिचा अभिनय केवळ प्रेक्षकांच्याच नव्हे, तर तिच्या कुटुंबियांच्याही हृदयाला भिडतो.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.