
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अशा अनेक आरोपांवर खुद्द राऊतांनीच स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणामुळे उबाठा गटाचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर उघडा पडला. राऊत म्हणाले, “२०१४ साली एका-एका जागेवर ७२ तास चर्चा चालली होती. देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरून कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली.” त्यामुळे ज्यापद्धतीने युती तुटण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जात होते, त्यावर खुद्द राऊतांनीच स्पष्टीकरण दिले आहे. मुळात राऊतांच्या प्रमाणपत्राची तशी गरजही नाही. मात्र, त्यांना आताच इतके उमाळे कसे दाटून आले हाच खरा प्रश्न.
दिशा सालियानच्या वडिलांनी मुलीची आत्महत्या नसून, हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. तसेच परवा कुणाल कामराच्या प्रकरणानंतरही ठाकरे गट काहीसा बॅकफूटवरच फेकला गेला. तसेच विरोधी पक्षनेत्याचे भिजत घोंगडेही कायम आहेच. अशा काही कारणास्तव अचानक मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाचे उमाळे तर उबाठा गटाला दाटून येत नाही ना, अशी शंका निर्माण व्हायला पुरेसा वाव आहेच. तसेच इकडे फडणवीस यांनी दिशाच्या वडिलांनी पुरावे सादर करावे, त्याप्रमाणे पुढे तपास होईल, असे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, असेही सांगितले आहे. त्यामुळे दररोज आततायीपणे आणि तावतावाने बोलणारे राऊत आता अचानक नरमल्याने त्यांना नरमण्यासाठी ‘मातोश्री’वरून तर निर्देश आले नाही ना, असाही प्रश्न उपस्थित राहतो. एकूणच युतीची ‘दिशा’ भरकटवणारे लोभी कोण, हे जनतेसमोर आलेच.
मिश्किल नव्हे बेजबाबदार टीका!
मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘खोक्याज्ञान’ सांगितले. यावेळी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, सगळी विधानसभाच खोक्याभाईंनी भरली आहे,” असा टोला लगावला. आता याला टोला म्हणावे की, अपूर्ण माहिती हा संशोधनाचा विषय. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणीदेखील केली. “ते कधी निवडून तरी आले का,” असा टोला अजितदादांनी मारला. अजितदादांची टिप्पणी मिश्किल जरी असली, तरी तितकीच खरी आणि विचार करायला लावणारी. मागील विधानसभेत मनसेचा एकमेव आमदार होता, तो आमदारही मग खोक्याभाईंसोबतच बसत होता, मग तोही खोक्याभाई झाला का? २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूकसुद्धा जिंकू शकले नाही. समजा, अमित ठाकरे जिंकून आमदार झाले असते, तर तेही ‘खोक्याभाई’ झाले असते का? खोक्या प्रकरणात राज्य सरकारने खोक्याला अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, तरीही त्याचा संदर्भ घेऊन थेट सर्वच्या सर्व आमदारांना ‘खोक्याभाई’ संबोधायचे हा प्रकार योग्य नाही.
आपल्या मुलाला निवडून आणू न शकणार्या राज यांना अशाप्रकारे विधाने करून काय साध्य करायचे आहे, हे त्यांनाच माहीत. कारण, अशाप्रकारे विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांवर दोषारोपण करणे, हा जनमताचाही एकप्रकारे अपमानच. त्यातच संदीप देशपांडे यांना आता मनसेचे मुंबई अध्यक्षपद देण्यात आले. जिथे मनसेचा जन्म झाला, तिथे आजवर मुंबईला अध्यक्ष नव्हता, ही मोठी चिंतेची बाब. असो. पण, रस्त्यावरील लढाई वेगळी आणि प्रत्यक्ष विधिमंडळाचे कामकाज वेगळे, हे समजून घ्यायला हवे. एकूणच राज ठाकरे सध्या मनसेला बळकटी देण्यासाठी राज पदाधिकार्यांचे मेळावे घेत असले, तरी त्यात मार्गदर्शन कमी आणि टोमणेबाजी अधिक असते. एकेकाळी नाशिक शहरात महापौर आणि ४० नगरसेवक असलेली मनसे आता औषधालाही शिल्लक राहिली नाही. राज ठाकरे यांनी मागेही गंगाजलावर अभद्र टिप्पणी केली होती. अप्रत्यक्षपणे सनातनचा अपमानही केला. एकेकाळी हिंदुत्वाची शाल पांघरून मोदींच्या समर्थनार्थ उतरलेले हेच ते राज ठाकरे आहेत का, असाच प्रश्न उपस्थित होतो.