भारतीयांनी वैदिक काळात स्थापत्य, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये अपार असे ज्ञान आणि कौशल्य संपादित केले होते. दीर्घकाळापर्यंत भारतीय या ज्ञानाचा दैनंदिन वापर करत होते. मात्र, इंग्रजी आक्रमणानंतर त्यात खंड पडला. तेव्हा अशाच काही भारतीय वैज्ञानिक संशोधन परंपरांचा पुनःपरिचय करुन देणारा हा लेख...
भारतीय गणिती परंपरेची तोंडओळख आपण मागील लेखात पाहिली. वेदांगज्योतिषापासून सुरू झालेल्या या परंपरेचा विकास, पंधराव्या शतकापर्यंत कसा होत गेला आणि पाश्चात्य जगाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या मुळाशी भारतीय गणिताच्या संकल्पना कशा महत्त्वाच्या ठरल्या हे आपण पाहिले. याच गणितातील प्रगतीची दुसरी बाजू म्हणजे, वैज्ञानिक संशोधनातील प्रगती. प्राचीन तसेच मध्ययुगीन भारतीय चिंतकांनी विज्ञान तसेच, तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्या महत्त्वाच्या शाखांचा विचार केला होता, संशोधनातील प्रगतीचे कोणते टप्पे भारतीय समाजाने गाठले आणि भारतीय समाजाच्या वैज्ञानिक प्रगतीची तुलना युरोपीय समाजाशी केल्यास आपल्याला काय चित्र दिसते, त्याचा आज आपण विचार करू.
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, वैदिक कालखंडात ‘गणित’ आणि ‘खगोलशास्त्र’ या भिन्न ज्ञानशाखा समजल्या जात नसत. वेदांगज्योतिषात ही दोन्ही शास्त्रे जाणणार्या ऋषींना ‘गणक’ अशीच संज्ञा होती. खगोलशास्त्र हे या काळात मुख्यत्वे कालमापनाचे शास्त्र होते. विवक्षित तिथींना आणि विशिष्ट ऋतूंमध्ये करण्याच्या यज्ञांची निश्चित वेळ ठरवता यावी, यासाठी ग्रहगतींचे अचूक नियम ठरवणे हा मुख्य उद्देश असला, तरी त्याअनुषंगाने या भ्रमणांची कारणमीमांसा केलेलीही आपल्याला आढळते. या कालखंडातील प्रमुख खगोलशास्त्रविषयक संकल्पना आपण पाहिल्या, तर सूर्यमालेची संकल्पना आणि स्थिर अशा नक्षत्रचक्राच्या पार्श्वभूमीवर ग्रहांचे भ्रमण याचा उल्लेखही प्रामुख्याने दिसतो. नक्षत्रांचे वर्णन करताना त्यांची संख्या २७ की २८ हे निश्चित झालेले नव्हते. कृत्तिका नक्षत्रापासून चक्राची सुरुवात करून, त्यात काहीवेळा अभिजीत नक्षत्राचा समावेश होत असे. आज आपल्या नक्षत्रचक्राची सुरुवात रेवती/अश्विनी नक्षत्रापासून होते, याचा संबंध कदाचित वेदांगज्योतिषाच्या कालनिश्चितीसाठी होऊ शकतो. सूर्याचे अयनचलन भारतीयांना ज्ञात होते, हे भीष्माच्या इच्छामरणाच्या कथेमुळे सर्वांना माहीत आहेच. परंतु, आयनिक वृत्ताचे वर्णन त्याचा वैषुविक वृत्ताशी असलेला कोन, चंद्राच्या कक्षेशी असलेला कोन आणि त्याचे ग्रहणांच्या वेधासाठी असलेले महत्त्व याचे शास्त्रीय वर्णन भारतीय ग्रंथांत आढळते. नंतरच्या काळात, ज्याला ‘सिद्धांतकाळ’ म्हणून ओळखले जाते, या सर्व वेधांची परिमाणे अधिकाधिक अचूक करण्याचा प्रयत्न झाला. अत्यंत दीर्घ काळासाठी नोंदवलेल्या वेधांच्या आधारे सूर्याचा भ्रमणकाल, चंद्राचा नक्षत्र भ्रमणकाल आणि पृथ्वीभोवतीचा भ्रमणकाल हे अचूकपणे नोंदवून दिवस, महिने आणि वर्षाचे कोष्टक बनवले गेले. एका वर्षातले दिवस पूर्णांकी नसतात, म्हणून लीप वर्षाची संकल्पना सर्वांना माहीत आहे. पण, एका महिन्याचे दिवसही पूर्णांकी नसतात. पाश्चात्य दिनदर्शिका त्यावर महिन्यांचे दिवस स्वच्छंदपणे ३०, ३१ असे ठरवते. भारतीय पंचांगात मात्र यावर उपाय म्हणून, अचूक नियमांनुसार क्षयतिथी आणि अधिकतिथीचे प्रयोजन असते. जेणेकरून दर महिन्यात ३०च तिथी बसतात. त्यानंतर महिना आणि वर्षाचे कोष्टक बसवण्यासाठी, अधिक मासाचा प्रयोग आपल्या पंचांगात केला आहे.क्षयतिथींचे आणि अधिकमासाचे गणित, हा भारतीय खगोलशास्त्रातील कोणत्याही सिद्धांताचा महत्त्वाचा भाग असतो.
वेधांच्या आधारे मिळणार्या माहितीचे योग्य आकलन होण्यासाठी, ग्रहगोलांच्या स्थितीविषयी सिद्धांतनिर्मिती आवश्यक आहे. सिद्धांत कालखंडात भारतीय वैज्ञानिकांचे सूर्यमालेचे आकलन हे ‘एपिसायकल’ या प्रतिमानावर आधारित होते. हेच प्रतिमान ग्रीक खगोलशास्त्रातही वापरले जाई. मात्र, भारतीयांनी विविध प्रकारच्या गतींचा वापर करीत, हे प्रतिमान बरेच अचूक बनवले होते. भारतीय खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरते, पृथ्वीचा अक्ष हळूहळू फिरत असतो (या गतीला एका फेरीस २६ हजार वर्षे लागतात), चंद्र हा पृथ्वीपेक्षा लहान आहे (ग्रहणांच्या वेधांवरून) आणि पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, याविषयीचे ज्ञान झाले होते. खगोलशास्त्रासाठी वापरल्या जाणार्या उपकरणांचाही विचार भारतीय खगोलशास्त्रात आढळतो. शंकू, घटिका, धनुर्यंत्र आणि गोलयंत्र ही भारतीय सिद्धांत ग्रंथांमध्ये आढळणारी प्रमुख उपकरणे आहेत.
खगोलशास्त्राप्रमाणेच प्राचीन काळापासून भारतात विकसित होत गेलेले शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र. या विषयाच्या दोन मुख्य शाखा म्हणजे, धातुविज्ञान आणि औषधविज्ञान. इथे हे महत्त्वाचे लक्षात घेतले पाहिजे की, या शाखा आजच्या रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून आहेत. भारतीय दृष्टीने पाहता असा काही भेद मुळात अस्तित्वातच नाही. धातुविज्ञान या शाखेत मुख्यत्वे खनिजांचे उत्खनन आणि त्यावर प्रक्रिया, मिश्र धातूंची निर्मिती आणि विविध संयुगांची निर्मिती याचा विचार झाला. यामध्ये पोलादनिर्मिती हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान होते. कारण, पोलादाचा शस्त्रे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असे. याव्यतिरिक्त अन्य प्रकारेसुद्धा लोखंड न गंजता दीर्घकाळ कसे टिकू शकेल, याचे संशोधनही लोखंडाची विविध अवजारे बनवण्यास आवश्यक होते. गंधक, फॉस्फरस यासारख्या अधातू मूलद्रव्यांचे आणि त्यांच्या रासायनिक अभिक्रियांचे ज्ञानही यासाठी आवश्यक होते. दिल्लीचा सुप्रसिद्ध लोहस्तंभ भारतीय रसायनशास्त्राच्या प्रगतीची साक्ष आहे. ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतरही एकोणिसाव्या शतकापर्यंत, भारतात अनेक ठिकाणी छोट्या पोलादाच्या भट्ट्या कार्यरत असल्याचे उल्लेख आहेत. धातुविज्ञानाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, मौल्यवान धातूंपासून दागिने घडवणे. सोने, चांदी आणि रत्नांपासून विविध आभूषणे घडविणे, याचा उल्लेख प्राचीन काळापासून भारतात आढळतो. परंतु, त्याचे तंत्रज्ञानविषयक महत्त्व, म्हणजे या धातूंच्या बारीक तारा घडवणे किंवा अत्यंत पातळ असे पत्रे घडवणे याची कारागिरी भारतात जोपासल्याचे आपल्या लक्षात येते.
‘औषधविज्ञान’ ही शाखा आयुर्वेदाशी जोडली गेलेली आहे. मात्र, केवळ वनस्पतींच्या अर्कांचा वापर औषधी म्हणून न करता, पारा आणि गंधकाच्या विविध संयुगांचा वापर चिकित्सा आणि औषधयोजना यासाठी कसा करता येईल, याचा विचारही आयुर्वेदाच्या ग्रंथांतून दिसतो. आयुर्वेद चिकित्सा ही तर आजच्या काळापर्यंत टिकून राहिली आहे. या शास्त्राचा क्रमविकास पाहिल्यास, भारतीय समाज संपूर्ण जीवसृष्टीकडे कशा प्रकारे पाहतो, हे आपल्या लक्षात येते. त्रिगुणात्मक सृष्टिकल्पना आणि त्यांच्या परस्पर समन्वयातून होणारी विविध भावांची, रसांची, गुणधर्मांची उत्पत्ती या मूळ संकल्पनेला धरून सर्व वनस्पती अथवा रसायनांचे गुणधर्म कोणते? अशा भूमिकेतून प्रथम जीव-रसायनशास्त्राचा विचार आपल्याकडे झाला आणि त्याचे उपयोजन म्हणून, त्रिदोषात्मक प्रकृती चिकित्सापद्धती शोधली गेली. इथे पुन्हा हे लक्षात घ्यायला हवे की धातुविज्ञान, औषधविज्ञान आणि आयुर्वेद चिकित्सा असे आज आपण तीन विषय म्हणत असलो, तरी भारतीय दृष्टिकोनातून ही एकाच विषयाची विविध अंगे आहेत. आयुर्वेदाचा उल्लेख त्यातील शस्त्रक्रिया आणि त्यासाठीच्या अवजारांच्या उल्लेखाशिवाय अपुरा आहे. या विषयातील संशोधन केवळ औषधी उपाययोजना इतके मर्यादित न राहता, रोगाचे मूळ शोधण्यासाठी शरीररचनाशास्त्राचाही विचार भारतात झाला होता आणि त्याचेच पुढचे पाऊल म्हणून शस्त्रक्रियांचे प्रयोगही भारतात होत असत.
या सर्व चिंतनाच्या मुळाशी आपण पाहिले, तर त्यामागे हिंदू तत्त्वचिंतनाचा पदार्थविचार आपल्याला दिसतो. भौतिक जगात दिसणार्या विविध पदार्थांचे मूळ स्वरूप काय, त्यांच्यात भिन्न प्रकृती आणि गुणधर्म कसे निर्माण होतात, त्यांच्या उत्पत्ती प्रक्रियाविषयीचे तत्त्वचिंतन हा हिंदू दर्शनांचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. जड आणि चेतन या दोन प्रकारात संपूर्ण चराचराची विभागणी केल्यावर त्यांचे परस्परसंबंध कसे निर्माण होतात, याचे विवेचन आवश्यक आहे. त्यासाठी जडसृष्टीची तपशीलवार माहिती आणि तिचे सिद्धांतन आवश्यक ठरते. यातूनच ‘भारतीय अणुसंकल्पने’चा जन्म झाला आहे. आज आपण वैशेषिक दर्शनाचे जनक असलेल्या महर्षी कणाद यांना अणुसंकल्पनेचे जनक म्हणतो. परंतु, या कल्पनेची मुळे आपल्याला अन्य वैदिक तसेच, जैन दर्शनांमध्येही आढळतात.
विज्ञानाची ही प्रगती आज आपण ज्याला मूलभूत विज्ञान म्हणून ओळखतो, तेवढ्यापुरती मर्यादित राहिलेली दिसत नाही. तंत्रज्ञानातील भारतीय समाजाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास असे दिसते की, कित्येक क्षेत्रांमध्ये भारतीय तंत्रज्ञान जगात कित्येक शतके अग्रेसर होते. यातील थोडक्या विषयांचाच आढावा विस्तार भयास्तव घेऊ. पहिले स्वाभाविकपणे डोळ्यांसमोर उभे राहणारे शास्त्र म्हणजे मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यकला. अनेक शतके बांधली जाणारी मंदिरे, त्यांच्या कलाकुसरीसाठी निर्माण केलेली भित्तिशिल्पे, त्यांचे ध्वनिशास्त्राच्या अनुसार बांधलेले मोठमोठे मंडप हे सर्व एका प्रगत तंत्रज्ञानाची साक्ष देते. दक्षिण भारतात आणि तेथील राजवटींचे सांस्कृतिक प्रभुत्व असलेल्या दक्षिण आशियात, आजही मोठमोठी मंदिरे स्थापत्यशास्त्रातील प्रगतीची साक्ष म्हणून उभी आहेत. याचप्रकारे प्रसिद्ध असलेले दुसरे भारतीय तंत्रज्ञान म्हणजे कापडनिर्मिती. वस्त्रे विणण्यासाठी योग्य असे विविध वनस्पतींपासून आणि प्राण्यांच्या लोकरीपासून मिळणारे धागे यासंबंधीचे ज्ञान, त्यांना विणण्याच्या विविध पद्धती, त्यासाठी आवश्यक असे माग बनवण्याचे तंत्रज्ञान असे अनेक आयाम असलेले हे तंत्रज्ञान, ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत जिवंत होते आणि भारताच्या एकूण निर्यातीचा महत्त्वाचा भाग होते. तिसरे उल्लेखनीय शास्त्र म्हणजे नौकाबांधणी आणि नौकानयन. दीर्घ समुद्रकिनारा लाभलेला भारतीय समाज, हा हिंदू महासागरातील भारताच्या भौगोलिक महत्त्वामुळे प्राचीन काळापासून सागरी प्रवास करणारा राहिला आहे. खगोलशास्त्राच्या समृद्ध परंपरेमुळे नौकानयन हे भारतीयांसाठी स्वाभाविकपणे सोपे होते. पर्यावरणाचा, आणि त्यातही मोसमी वार्यांचा अभ्यास करून, विशेषतः दक्षिण भारतीय हिंदू समाज हा आग्नेय आशिया तसेच आफ्रिकेचा पूर्व किनारा या भागात सागरी संचार करत असे. यासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या नौका कशा बांधाव्यात, याचे तंत्रज्ञानात्मक आराखडेसुद्धा भारतीय ग्रंथांत सापडतात.
आज सर्वत्र आढळणार्या वैज्ञानिक शोधांच्या मुळाशी आपल्याला युरोपीय वैज्ञानिकांनी लावलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या शास्त्रशाखांमधील मूलभूत शोध दिसतात. त्यामुळे स्वाभाविकच अशी समजूत होते की, आधुनिक समाजाच्या वैज्ञानिक प्रगतीचा मूलाधार हे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकातील युरोपीय वैज्ञानिक आहेत. अन्य समाजांचे वैज्ञानिक प्रगतीतील योगदान नाकारल्याने आणि त्याची योग्य ऐतिहासिक चिकित्सा न केल्याने, संपूर्ण जागतिक समाज एकप्रकारे युरोपच्या ऋणात असल्याची भावना निर्माण होते. या न्यूनत्वाच्या भावनेस दूर करायचे असेल, तर वैज्ञानिक संशोधनातील भारतीय समाजाच्या योगदानाची यथार्थ जाणीव प्रथम भारतीय समाजास आणि त्यापाठोपाठ जागतिक समाजास करून देणे आवश्यक आहे.
(लेखकाने मुंबईतील टीआयएफआर येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३