‘म्हाडा’च्या जमिनींवर ‘हिरवी’ अतिक्रमणे

विधानसभेत मुद्दा उपस्थित; जमिनीऐवजी थेट तिसर्‍या मजल्यावर थाटली मजार

    26-Mar-2025
Total Views |

Sanjay Upadhyay on MHADA land  
 
 
मुंबई: ( Sanjay Upadhyay on MHADA land ) “मुंबई शहर आणि उपनगरात ‘म्हाडा’सह शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणात ‘हिरवी’ अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यात अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मानखुर्दमध्ये २०० फूट उंचावर एक मजार बांधण्यात आली आहे. जमिनीवर मजार असते, पण येथे तिसर्‍या माळ्यावर मजार थाटण्यात आली आहे. हे जगातील आठवे आश्चर्य आहे. वाढती अतिक्रमणे मुंबईच्या सुरक्षेसाठी घातक असल्याने ती तत्काळ हटवण्यात यावी,” अशी मागणी भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत केली.
 
शासकीय जमिनींवर होत असलेल्या धार्मिक अतिक्रमणांबाबत आ. उपाध्याय यांनी लक्षवेधी मांडली. ते म्हणाले की, “मुंबई शहर आणि उपनगरात शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून अनधिकृत बांधकामे आणि अनाधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. त्याबाबत अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणतीही कारवाही झालेली नाही. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील ‘म्हाडा’ कॉलनीजवळ ‘म्हाडा’च्या जागेवर नूर-ए-इलाही या मशिदीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.
 
मालवणी येथील (न्यू कलेक्टर कंपाऊंड गेट क्र. ५) नगर भूमापन क्र. १८४१ वरील अनधिकृत बांधकाम, कोळीवाडा येथील वॉर्ड नं. २२४ ‘ब’ वॉर्डमधील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम, वाशी नाका चेंबूर येथे ‘म्हाडा’च्या जमिनीवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, साईबाबा नगर धारावी येथे करण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळाचे बांधकाम, चेंबूर येथील ‘संगम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ जागेवर अतिक्रमण करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम यांचा समावेश त्यात आहे.
 
या धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही. त्याविषयी स्थानिकांनी तक्रार केली असता, अधिकार्‍यांनी डोळेझाक केली. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सर्व अतिक्रमणे पाडून जागा शासनाने ताब्यात घ्यावी,” अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली. “राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अबूजवाडीमध्ये धार्मिक अतिक्रमणावर तोडकाम करून मैदान मोकळे केले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. मंत्र्याच्या विरोधात याचिका करणार्‍यांकडे पैसा कुठून येतो? ही अतिक्रमणे मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत,” असेही उपाध्याय म्हणाले.
 
गोमांस तस्करी
 
“दि. २३ मार्च रोजी नागपाडा पोलिसांच्या हद्दीत एका दुकानातून गोमांस तस्करी होत असल्याचे उघडकीस आले. गोमांस ट्रकमध्ये भरण्यात येत होते. त्याविरोधात तक्रार करण्यात आली. परंतु, हद्द कुणाची आहे, हे ठरवण्यात पोलिसांचे तीन तास गेले. त्यामुळे कोणताही कारवाई झाली नाही. आता येत्या दि. ३० मार्च रोजी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस येऊ शकते. त्यामुळे पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्यात,” अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली.
 
चौकशी करून कारवाई करणार : उदय सामंत
 
“मुंबई शहर व उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची ‘म्हाडा’च्यावतीने कारवाई लवकरात लवकर होईल. विशेषतः राखीव भूखंड, सार्वजनिक जागा आणि खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी कडक पावले उचलली जातील,” अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
मजार बांधणे म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा मुडदा गाडणेे. याचा अर्थ या लोकांनी तिसर्‍या मजल्यावर कोणाचा मुडदा गाडला, हा प्रश्न आहे. अशा लोकांची मानसिकता पाहता, ती मजार कोणाची आहे, हे सरकारने आधी शोधून काढले पाहिजे आणि त्यानुसार कडक कारवाई केली पाहिजे.
 
- गोविंद शेंडे, क्षेत्रमंत्री, विश्व हिंदू परिषद