‘मातोश्री’ बोले, कामरा भुंके!

    25-Mar-2025   
Total Views |

ubt on kunal kamra controversy
 
 
काल दिवसभर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर आपण सगळ्यांनीच ऐकले. हे गाणे व्हायरल झाल्यावर अपेक्षित ती जळजळीत प्रतिक्रियाही शिवसेनेकडून आलीच. पण, त्यानंतर महाराष्ट्रात कशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते, इथे कशी हिटलरशाही आहे, कलाकारांना, त्यांच्या विनोदी कलेला कशी किंमत नाही वगैरे प्रतिक्रिया ठाकरे गटासह विरोधकांच्या तोंडून बाहेर पडल्या. आता असेच एखादे टीकात्मक गाणे उद्धव ठाकरेंवर कॉमेडीच्या नावाखाली कुणी व्हायरल केले असते तर? साहजिकच, जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसैनिकांनी दिली, तशीच प्रतिक्रिया ठाकरे गटाकडूनही आली असती. कारण, अशाप्रकारे आपल्या राजकीय नेत्याचा अपमान कार्यकर्त्यांना सहन होणे नाही. पण, दुर्दैवाने ठाकरे गटाला कामरा चुकला, असे वाटतच नाही. कारण, कुणाल कामराच्या त्या गाण्याची ‘स्क्रिप्ट’ ही ठाकरे गटानेच लिहिलेली असावी, इतका त्यात ठाकरी शब्दकोशाचा प्रभाव! म्हणजे बघा, ‘रिक्षा’, ‘दाढी’, ‘गद्दार’, ‘फडणवीस की गोद’, ‘बाप चुराकें.’ ही शब्दांची लाखोली शिवसेनेच्या फुटीपासूनच एकनाथ शिंदेंवर वाहणारी ठाकरे आणि त्यांचीच टोळी. जेव्हा नेमक्या याच शब्दांची गुंफण करून कुणी एक स्टॅण्डअप कॉमेडियन थेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यावर, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची फिरकी घेत असेल, तर ते कदापि स्वीकार्ह नाही.
 
राजकीय मंडळींनी अशा एकमेकांवर दुगाण्या झाडणे, हे नित्याचेच. तो त्यांच्या राजकारणाचाच भाग. पण, एका स्टॅण्डअप कॉमेडियनने विनोदाच्या नावाखाली अशाप्रकारे एका नेत्याची निंदानालस्ती करणे हे निर्लज्जपणाचेच लक्षण! एवढेच नाही तर याच कुणाल कामराचा संजय राऊत यांच्याबरोबर काही वर्षांपूर्वी पॉडकास्टही प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी कामराने राऊतांना खेळण्यातले बुलडोझरही दिले होते. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका करणार्‍या कंगना राणावतच्या घरावर बुलडोझर फिरवल्यानंतर त्या कारवाईचे कुत्सित प्रतीक म्हणून कामराने ते बुलडोझर राऊतांच्या हाती दिले. त्यामुळे कामराची ‘मातोश्री’शी जवळीक सर्वज्ञात. त्यामुळे दिशा सालियानच्या प्रकरणावरून माध्यमांचे, जनतेचे लक्ष हटविण्यासाठी ठाकरे आणि राऊतांनी कामराचा बळी दिला का, असाच प्रश्न उपस्थित होतो.
 
 
अभिव्यक्तीची अतिशयोक्ती
 
 
कामराच्या वाचाळपणामुळेच काल खारच्या स्टुडिओची शिवसैनिकांनी मोडतोड केली. त्यावरून मुंबईत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होत असून, कलाकार सुरक्षित नाही वगैरे पोपटपंची ठाकरे-राऊत जोडगोळीने केली. पण, खुद्द ठाकरेंनी आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांनी २०१९ ते २०२२ दरम्यानचा ठाकरेंच्याच मुख्यमंत्रिपदाचा अडीच वर्षांचा काळ जरा आठवून पाहावा. या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या कायदे-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते. आधीच ‘कोरोना’ महामारी आणि त्याच ठाकरेंच्या दादागिरीने अवघे राज्य अस्वस्थ होते. आज जे ठाकरे कलाकारांच्या अभिव्यक्तीविषयी उच्चरवाने बोंबा ठोकत आहेत, हे तेच ठाकरे होते, ज्यांनी अभिनेत्री कंगना राणावत, आरजे मलिष्का यांच्या घरांवर सूडबुद्धीने कारवाई केली. या दोघींचा गुन्हा तो काय होता मुळी? कंगनाने “मुंबईत सुरक्षित वाटत नाही, पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्यासारखे वाटते,” अशा आशयाचे विधान केल्यानंतर, तिच्या वांद्य्राच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. सुदैवाने प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि त्यावर कंगनाने स्थगिती मिळवली. तेव्हाच संतापलेल्या कंगनाने, “आज मेरा घर टूटा हैं, कल तेरा घमंड टूटेगा,” म्हणत उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता आणि शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंचा हाच अहंकार मुख्यमंत्रिपदासह गळून पडला.
 
मुंबईची प्रसिद्ध आरजे मलिष्का. तिने पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणार्‍या खड्ड्यांवर विडंबनकाव्य रचले. ‘मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय काय...’ या मलिष्काच्या प्रचंड व्हायरल झालेल्या गाण्याने मुंबई महानगरपालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पण, त्यानंतर काही दिवसांत पालिकेच्या पथकाने मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची नोटीस धाडली. एवढेच नाही तर माजी नौदल अधिकार्‍यालाही ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर केल्याप्रकरणी त्यावेळी शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे ठाकरेंच्या काळात सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, कंगना, मलिष्काचा छळ, अर्णब गोस्वामी यांना अटक अशाप्रकारे कलाकारांच्या, पत्रकारांच्या अभिव्यक्तीला सुरुंग लावण्यात आला. त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर ती अभिव्यक्ती आणि अन्यवेळी अतिशयोक्ती, हा ठाकरेंचा दुटप्पीपणा जनता विसरणार नाही!
 
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची