इतिहासाच्या विकृतीकरणाचा अनाठायी ‘सपा’टा!

25 Mar 2025 10:17:54

samajwadi party mp ramji lal suman alleged that rana sanga brought babur into india
 
 
समाजवादी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते वाटेल ते आरोप करून समाजात संभ्रम कसा निर्माण होईल, असा कायमच प्रयत्न करीत असतात. असाच एक बिनबुडाचा दावा समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजीलाल सुमन यांनी नुकताच केला. मेवाडचे महाराणा संग्रामसिंह म्हणजेच राणा संग हे ‘देशद्रोही’ असल्याचा दावा या महाशयांनी केला आहे. गेल्या दि. २२ मार्च रोजी राज्यसभेत बोलताना खासदार सुमन यांनी हा दावा केला. “राणा संग यांनी इब्राहिम लोदी याचा पराभव करण्यासाठी बाबरास भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते,” असा दावा या समाजवादी पक्षाच्या खासदाराने केला. पण, खासदार सुमन यांनी जो दावा केला, त्यात कितपत तथ्य आहे?
 
राणा संग यांचे चरित्र खूप काही वेगळा इतिहास सांगणारे आहे. लोदी घराण्यास सत्तेवरून घालविण्यासाठी राणा संग यांनी बाबरास भारतात बोलाविले, असा जो दावा केला गेला, तो चुकीचा असल्याचे तत्कालीन इतिहासावरून दिसून येते. बाबराने भारतावर आक्रमण करण्यापूर्वी राणा संग यांनी इब्राहिम लोदी आणि अन्य सत्ताधीश यांच्याविरुद्धच्या अनेक लढाया जिंकल्या होता. हे पाहता, राणा संग यांना बाहेरून मदत घेण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्याकाळी राणा संग हे अत्यंत प्रभावशाली राजे होते. १५०८ साली मेवाडच्या सिंहासनावर स्थानापन्न झालेले राणा संग हे शूर, अत्यंत मुत्सद्दी होते. त्यांनी १००हून अधिक लढाया जिंकल्या होत्या. त्यांनी लढायांमध्ये आपला एक डोळा, हात गमावला होता. त्यांच्या शरीरावर ८० हून अधिक जखमा होत्या. खानवा येथे झालेली लढाई वगळता अन्य कोणत्याच युद्धात त्यांचा पराभव झाला नव्हता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना ‘हिंदूपत’ ही उपाधी देण्यात आली होती. राणा संग यांचे साम्राज्य आग्रापासून दक्षिणेस गुजरातपर्यंत पसरले होते. कर्नल जेम्स टोड या इतिहासकाराने, राणा संग यांच्याकडे ८० हजारांचे घोडदळ, ५०० हत्ती आणि दोन लाख सैनिक होते, अशी नोंद केली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांचा दबदबा होता, असा उल्लेखही त्याने केला आहे.
 
मुत्सद्देगिरीच्या आणि युद्धकौशल्याच्या जोरावर राणा संग यांनी अनेक आक्रमणे परतवून लावली होती. असे असताना, राणा संग यांनी बाबरास निमंत्रण दिले होते, असा आरोप करणे मूर्खपणाचे मानायला हवे, नाही का? १५०७ साली खातोली येथे झालेल्या लढाईत त्यांनी इब्राहिम लोदी याचा पराभव केला होता. अन्य लढायांमध्ये लोदी याचा पराभव करून उत्तर भारतावर असलेली त्याची पकड राणा संग यांनी ढिली केली होती. राणा संग यांनी माळव्याच्या मोहम्मद खिलजी (द्वितीय) याचा पराभव केला होता. खिलजीला पकडण्यात आले होते. पण, नंतर त्यास सोडून देण्यात आले. बाबराने पानिपतच्या १५२६ साली झालेल्या लढाईत इब्राहिम लोदी याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली होती. पण, त्या काळात बाबरास राजपूत आणि अफगाणी सैन्याकडून जोरदार विरोध केला जात होता. “दि. २१ फेब्रुवारी १५२७ रोजी राजपूत सैन्यासमवेत झालेल्या लढाईत बाबराचा पराभव झाल्याने त्यास माघार घ्यावी लागली होती,” असा उल्लेख इतिहासकार विल्यम इर्स्कीन यांनी केला आहे. या पराभवाचा उल्लेख ‘बाबरनामा’ मध्येही करण्यात आला आहे. बाबर हा विदेशी आक्रमक असल्याने त्यास भारतातून हाकलून लावायचेच, असा राणा संग यांचा निर्धार होता, असे इतिहासकार व्ही. के. कृष्णराव यांनी नमूद केले आहे. खरे म्हणजे, इब्राहिम लोदी याला सत्तेवरून घालविण्यासाठी दिल्लीची सुलतानी राजवट, पंजाबचा शासक दौलत खान, सिकंदर लोदीचा भाऊ अलमखान लोदी, इब्राहिम लोदी याचा काका अलाउद्दीन लोदी यांनी बाबरास १५२३ साली भारतावर आक्रमण करण्यासाठी बोलाविले होते. असे असताना समाजवादी पक्षाच्या खासदाराने पराक्रमी राणा संग यांची बदनामी करण्याचा जो प्रकार केला, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
 
विश्वासघातक्यास जोडे मारण्याची शीख परंपरा!
 
शीख इतिहासामध्ये ‘श्री मुक्तसरसाहिब’ या तीर्थस्थानास महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी या शहरास ‘खिन्द्राने दी धाब’ या नावाने ओळखले जात होते. या ठिकाणी १७०५ साली ‘मुक्तसर युद्ध’ झाले होते. त्या युद्धात ४० शीख लढवय्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. ‘चाली मुक्ते’ असे त्यास संबोधले जाते. या ठिकाणी आणखी एक घटना घडली. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची हत्या करण्याच्या कुटील हेतूने सरहिंदचा शासक वझीर खान याने नूरदिन या इसमास त्यांच्या छावणीत पाठविले होते. शीख सैनिक असल्याचे भासवून तो तेथे दाखल झाला होता. गुरू गोविंदसिंह यांची हत्या करण्याचे आदेश त्यास देण्यात आले होते. एकेदिवशी सकाळी गुरू गोविंदसिंह हे मुखमार्जन करीत असताना नूरदिन याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. पण, तेवढ्याच तत्परतेने गुरू गोविंदसिंह यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला करून त्यास जबर जखमी केले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या नूरदिनने त्यांच्याकडे मुक्ती देण्याची विनवणी केली. पण, या नूरदिन याने जो दगाफटका केला होता, ते लक्षात घेऊन त्याची गद्दारी कायम स्मरणात राहावी, म्हणून गुरू गोविंदसिंह यांनी आपल्या अनुयायांना एक आदेश दिला. नूरदिन याची कबर असलेल्या ठिकाणास जे कोणी भेट देतील, ते नूरदिनच्या कबरीवर पाच वेळा जोडे मारतील, असा आदेश त्यांनी दिला. तेव्हापासून सुरू असलेली ही परंपरा आजदेखील कायम आहे. गुरू गोविंदसिंह हे ‘दत्तन’ने दात घासत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. जेथे ही घटना घडली ते स्थान ‘श्री दत्तनसाहिब’ म्हणून ओळखले जाते. या स्थानास जे शीख भेट देतात, ते नूरदिनच्या कबरीवर पाच वेळा जोडे मारून गुरू गोविंदसिंह यांच्या आदेशाचे पालन करतात! दगाफटका, विश्वासघात करणार्‍या नूरदिन यास गुरू गोविंदसिंह यांनी जे शासन केले, त्याचे स्मरण या स्थानास भेट देणार्‍या सर्वांनाच होते!
 
अब्दुल हक्कीमवर कारवाईचे आदेश!
 
हिंदू समाजात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशी वृंदावनात लावलेल्या तुळशीचे पूजन केले जाते. अशा तुळशीचा अवमान करण्याचा, पावित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केरळमधील एका मुस्लिमाने केला. या सर्व घटनेची चित्रफीत अलापुझ्झा येथील रहिवासी श्रीराज आर. ए. यांनी समाजमाध्यमांवर टाकली होती. आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम खात्यावर त्याने सदर चित्रफीत अपलोड केली होती. त्याबद्दल त्यास अटक करण्यात आली होती. पण, श्रीराज याने केवळ ही चित्रफीत अपलोड केली होती. या घटनेचा खरा सूत्रधार अब्दुल हक्कीम मात्र तुळशी वृंदावनाचा अपमान करून मोकाटच होता. हे सर्व प्रकरण केरळ उच्च न्यायालयापुढे आल्यानंतर न्यायालयाने अब्दुल हक्कीम याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. हिंदू समाजाच्या भावना दुखविणारे अत्यंत अश्लाघ्य कृत्य अबुल हक्कीम यांनी केले होते. पण, त्याच्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. एकीकडे श्रीराजला अटक करण्यात आली, पण खरा आरोपी मात्र मोकाटच होता. ते लक्षात घेऊन न्यायालयाने अब्दुल हक्कीम याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. अब्दुल हक्कीम हा मनोरुग्ण असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरू झाले आहेत. अब्दुल हक्कीम हा एक हॉटेल चालवतो. तसेच, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे. अशी व्यक्ती मनोरुग्ण कशी काय असू शकते? श्रीराज आर. ए. याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याने केवळ अब्दुल हक्कीमने केलेल्या कृत्याची चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे लोकांपुढे आणली. पण, हिंदू समाजाचा अवमान करणारे कृत्य करणारा अब्दुल हक्कीम मात्र मोकाटच राहिला. आता त्याच्याविरुद्ध कारवाईचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. पाहूया केरळचे डावे सरकार अब्दुल हक्कीमविरुद्ध काय कारवाई करते ते!
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0