कोल्हापूर : (Prashant Koratkar News) प्राथमिक चौकशीनंतर आज दि. २५ मार्च रोजी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जुनागड पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली, परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूस बंदोबस्त लावून मागील दाराने कोरटकरला बाहेर काढून कोल्हापूर न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे आधीच कोल्हापूर न्यायालयात हजर झाले होते.
कोल्हापुरी चपला आणि चिल्लर घेऊन मोठ्या संख्येने शिवप्रेमी जुनागड पोलीस ठाण्याबाहेर कोरटकरचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमल्याचे पाहायला मिळाले. प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर प्राथमिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार आहे.