मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील शोवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगात्मक गाणी सादर केली होती. या प्रकारानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोडफोड केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकं काय घडलं?
कुणाल कामराने खार येथील एका कॉमेडी शोमध्ये हिंदी गाण्यांचे राजकीय विडंबन सादर केले. त्यानंतर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यक्रम झालेल्या हॉटेलवर हल्ला करत तोडफोड केली. पोलिसांनी या हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला, तसेच कुणाल कामरावरही गुन्हा नोंदवला आहे.
कुणाल कामराचे स्टेटमेंट:
या वादानंतर कुणाल कामराने चार पानी पत्रक प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली.
तो म्हणतो:
१. माझ्या शोसाठी निवडलेली जागा ही अशा प्रकारच्या विनोदी कार्यक्रमांसाठीच आहे.
२. जोक सहन न होणाऱ्या राजकीय नेत्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त श्रीमंतांसाठी नाही, हे समजावं लागेल.
३. मी कोणत्याही कायद्याच्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. राजकारणावर व्यंगात्मक टीका करणे गुन्हा नाही.
४ .पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करेन, पण हॉटेलची तोडफोड करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.
फोन नंबर लीक, धमक्या आणि मीडियावर टीका:
कुणाल कामराने सांगितले की, त्याचा फोन नंबर लीक करण्यात आला असून त्याला सतत धमक्या येत आहेत. त्याने हे कॉल्स व्हॉईस मेलवर ठेवले आहेत. माध्यमांनी बातम्या देताना भारताचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत १५९ वा क्रमांक असल्याची बाब लक्षात घ्यावी, असेही तो म्हणाला.
"मी कोणाचीही माफी मागणार नाही"
कुणाल कामराने स्पष्ट केले की, तो एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची माफी मागणार नाही. तो कुणालाही घाबरत नाही आणि पलंगाखाली लपून बसलेला नाही, असे त्याने म्हटले आहे.
हा वाद अजून किती वाढतो आणि यावर सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.