कुणाल कामराच्या विडंबन गाण्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हे विडंबन नाही सुपारी घेऊन केलेला आरोप..."!
25 Mar 2025 12:21:03
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये सादर केलेल्या विडंबन गाण्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने स्टुडिओ आणि त्याच्या संबंधित हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वातावरण तापले असताना, एकनाथ शिंदे यांनी मात्र कालपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
"जनतेने आरोप करणाऱ्यांना घरी बसवले आणि काम करणाऱ्यांना सत्ता..."
कुणाल कामराच्या गाण्यातील आरोपांविषयी विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले, “मी कोणत्याही आरोपांना उत्तर देत नाही. मी कामाने उत्तर देतो. याच कारणामुळे लोकांनी आरोप करणाऱ्यांना घरी बसवले आणि काम करणाऱ्यांना सत्ता दिली.”
"हे अभिव्यक्ति स्वातंत्र्य नाही, सुपारी घेऊन आरोप..."
शिंदेंनी या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला. “मी विडंबन समजू शकतो. अनेक कवींनी यापूर्वी विडंबन केले आहे. मात्र हे फक्त विडंबन नाही. हा व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन केलेला प्रकार आहे. माझ्यावर केलेले आरोप मी दुर्लक्षित केले, पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्रमोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याविषयी काय म्हटले ते बघा. पत्रकार अर्णब गोस्वामीसोबत झालेल्या वादानंतर त्याला काही एअरलाइन्समधूनही बाहेर काढण्यात आले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, हे सुपारी घेऊन आरोप करण्यासारखे आहे, त्यामुळे मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” असे शिंदे म्हणाले.
“मला सहन करण्याची ताकद आहे, त्यामुळे मी...”
शिंदेंनी या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “मी यावर बोलणार नाही. मी काम करणारा माणूस आहे. मला सहन करण्याची ताकद आहे. त्यामुळे मी कोणत्याही वादात न पडता फक्त लोकांची सेवा करण्यावर भर देतो, आणि त्यामुळेच माझ्या कामाचे यश स्पष्टपणे दिसत आहे.”
शिंदे यांच्या या प्रतिक्रियेनंतरही या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे.