मुंबई : ( Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेऊन दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
“या प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत"
वकील निलेश ओझा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हे प्रकरण दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला म्हणून या प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत.", तसेच "मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांच्यावर तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणातील दुसरे दोषारोपपत्र का दाबण्यात आले. ते कुणाच्या विरोधात होते?", असा सवाल वकील ओझा यांनी केला. "दिशा सालियान यांच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी जे काही गुन्हे केले, त्यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा पूर्ण गैरवापर केला. परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे त्यांच्या सांगण्यावरून काम करत होते", असा थेट आरोप करत वकील ओझा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"परमबीर सिंह यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला"
“आम्ही जी तक्रार दिली तीच एफआयआर आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मौर्य, सूरज पांचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत. या प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले आहे. त्यावेळी परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि असे सांगितले की आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यामध्ये कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता असे परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. म्हणजे याचाच अर्थ परमबीर सिंह यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप निलेश ओझा यांनी केला.