क्षयरोग निवारण्यासाठी...

    25-Mar-2025
Total Views |

article take a look at the potential dangers of tuberculosis and its treatment
 
क्षयरोग अर्थात टीबी हा आजही जगभरातील एक गंभीर संसर्गजन्य आजार असून, लाखो लोकांना त्याचा संसर्ग होताना दिसतो. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी दि. २४ मार्चला पाळला जातो. त्यानिमित्ताने या रोगातील संभाव्य धोक्यांचा आणि त्यावरील उपचारांचा घेतलेला मागोवा...
 
गतिक क्षयरोगाच्या ३० टक्के रुग्ण भारतात आहेत आणि बहुऔषधांना प्रतिरोधक असलेल्या जागतिक रुग्णांमध्ये ६२ टक्के रुग्ण आहेत. २०१५ पासून घटनांमध्ये १७ टक्के घट झाली असली, तरी २०२५चे लक्ष्य साध्य करणे अजूनही कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी रोगप्रतिकारक शक्तीपातळी, रोगाभोवतीचा कलंक-स्टिग्मा आणि बहुऔषधांना प्रतिकार किंवा कमी प्रभाव ही याची काही कारणे आहेत. वैद्यकीय प्रगती असूनही, या आजाराशी संबंधित कलंक, उपचारांकडे दुर्लक्ष आणि जागरूकतेचा अभाव या समस्याही आजही कायम आहेत. त्यामुळे क्षयरोग नियंत्रण करणे, अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत, रुग्णांना योग्य माहिती, भावनिक पाठबळ आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी, आरोग्य शिक्षण आणि समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
आरोग्यशिक्षण व समुपदेशनाचे महत्त्व
 
क्षयरोग नियंत्रणासाठी, प्रभावी आरोग्यशिक्षण व समुपदेशन सर्वार्थाने आवश्यक आहे. रुग्णांना या आजाराविषयी ज्ञान देणे, त्यांच्या शंका दूर करणे आणि उपचारांसंदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे यामध्ये समाविष्ट आहे. आरोग्यसेवा व्यावसायिकांनी क्षयरोगग्रस्त रुग्णांसोबत संवाद साधताना, आदर ठेवावा. गोपनीयता राखणे, सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन माहिती देणे आणि संवाद साधताना सोपी भाषा वापरणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. याशिवाय, रुग्णांना त्यांच्या उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित करणेही गरजेचे आहे. प्रभावी समुपदेशनामुळेच रुग्णांचे उपचार करून घेण्याचे प्रमाण वाढते, त्यांचा विरोध कमी होतो आणि त्यांना समाजात आत्मविश्वासाने जगता येते.
 
क्षयरोगाविषयी मूलभूत माहिती
 
रुग्णांना क्षयरोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो आणि त्याचा प्रसार कसा होतो, हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाचा जीवाणू या आजारास कारणीभूत असतो आणि तो संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकांमधून हवेत पसरतो. क्षयरोगाची लक्षणे म्हणजे सातत्याने खोकला येणे, रात्री घाम येणे, ताप, वजन कमी होणे आणि थकवा. याचे निदान थुंकी चाचणी, छातीचा एक्स-रे आणि आण्विक चाचण्यांद्वारे केली जाते. यावरील उपचारांसाठी औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
रुग्ण आणि समाजाच्या जबाबदार्‍या
 
रुग्णांनी औषधांचे नियमित सेवन करणे, खोकताना तोंड झाकणे आणि खोलीमध्ये योग्य वायुवीजन ठेवणे आवश्यक आहे. उपचारांदरम्यान नियमित आरोग्य तपासणी करावी आणि शक्य असल्यास, कुटुंब व साहाय्य गटांचा आधार घ्यावा. समाजानेही क्षयरोगाविषयी गैरसमज दूर करून, रुग्णांना पाठिंबा द्यावा. कलंक न बाळगता, रुग्णांचे मानसिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी सहकार्य करावे. औषधांचा कोर्स अर्धवट सोडल्यास, मल्टिड्रग रेझिस्टंट टीबी (MDR-TB) होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे औषधांचे नियमित सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना उपचारांमध्ये सातत्य राखणे कठीण जाते. यामागे औषधांचे दुष्परिणाम, विसरण्याची सवय, प्रेरणेचा अभाव किंवा दवाखान्यापर्यंत पोहोचण्याच्या अडचणी असू शकतात. अशा परिस्थितीत, आरोग्यसेवा देणार्‍यांनी प्रभावी समुपदेशन करून रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
 
मानसिक आरोग्य व भावनिक आधार
 
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे, समाजामध्ये याबाबत भीती आणि अनेक गैरसमज असतात. त्यामुळे टीबी झालेल्या व्यक्तींना, समाजाकडून वाळीत टाकले जाण्याचा धोका असतो. क्षयरोग केवळ शारीरिक आरोग्यालाच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. काही रुग्णांना कुटुंबातील सदस्य किंवा नोकरीच्या ठिकाणी भेदभाव सहन करावा लागतो. काही रुग्णांना रोगाच्या पुढील टप्प्यांबद्दल चिंता असते, तर काहींना आर्थिक अडचणी येतात. परिणामी, त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्या मनात निराशा व असाहाय्यतेची भावना निर्माण होते. क्षयरोगाच्या दीर्घकालीन उपचार प्रक्रियेमुळे, अनेक रुग्णांमध्ये नैराश्य आणि चिंता असे विकार दिसून येतात. उपचारांच्या कालावधीत सतत शारीरिक दुर्बलता, औषधांचे दुष्परिणाम, समाजाकडून नकारात्मक दृष्टिकोन आणि आर्थिक अडचणी यामुळे मानसिक तणाव वाढतो. काही रुग्णांना भविष्यातील आरोग्य आणि नोकरीच्या अस्थिरतेची भीती वाटते, ज्यामुळे त्यांच्यात चिंता विकार वाढतो.
 
क्षयरोगासाठी दिली जाणारी औषधेही काही वेळा मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. काही रुग्णांमध्ये औषधांमुळे मूड स्विंग्स, चिडचिड, निद्रानाश किंवा भ्रम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. गंभीर क्षयरोग, दीर्घकाळचे उपचार आणि सामाजिक उपेक्षा यांमुळे काही रुग्णांमध्ये निराशाजनक विचार आणि आत्महत्येचा धोका वाढतो. विशेषतः मल्टिड्रग रेझिस्टंट टीबी (MDR-TB) किंवा विस्तृत प्रतिरोधक क्षयरोग (XDR-TB) असलेल्या रुग्णांमध्ये हा धोका अधिक आढळतो. अनेक रुग्णांना समाजाकडून वाळीत टाकले जाते, ज्यामुळे ते नैराश्यात जातात. त्यामुळे, भावनिक पाठबळ आणि मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन गरजेचे आहे. कौटुंबिक आधार आणि सहकार्य गट यांचा उपयोग, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करता येतो. गरज भासल्यास, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणेही उपयुक्त ठरते.
 
उपचारांदरम्यान योग्य आहार घेणे गरजेचे आहे, कारण क्षयरोगामुळे वजन कमी होण्याचा धोका असतो. प्रथिनयुक्त पदार्थ जसे की अंडी, मासे, कोंबडी, डाळी, तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला आहार घेतल्यास, प्रतिकारक शक्ती वाढते. धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि भरपूर पाणी सेवन केल्याने शरीराची ऊर्जा टिकून राहते. आवश्यकता असल्यास आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणेही गरजेचे आहे. रुग्णांनी उपचार पूर्ण झाल्यानंतरही आरोग्याची काळजी घ्यावी. संतुलित आहार घ्यावा, व्यायाम करावा आणि धूम्रपान किंवा मद्यपान टाळावे. तसेच, क्षयरोग पुन्हा होऊ नये, म्हणून वेळोवेळी आरोग्य तपासणी करून खबरदारी घ्यावी. आरोग्यशिक्षण आणि समुपदेशन हे क्षयरोग नियंत्रणाचे महत्त्वाचे घटक आहेत. योग्य माहिती, मानसिक आधार आणि पोषणविषयक मार्गदर्शनाद्वारे, रुग्णांचे जीवनमान सुधारता येते. त्यामुळे, क्षयरोगग्रस्त व्यक्तींसाठी प्रभावी आरोग्यशिक्षण आणि समुपदेशनाच्या माध्यमातून आधार देत, त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 
 
 
डॉ. शुभांगी पारकर