फुल भी हैं चिंगारी भी हैं!

    25-Mar-2025   
Total Views |

article about madhavi arolkar
 
 
बेघर बालकांना शिक्षणाच्या परिघात आणण्यासाठी, शोषित, वंचित महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असणार्‍या मुंबईच्या माधवी अरोलकर. त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ ते ‘फुल भी हैं, चिंगारी भी हैं, हम भारत की नारी हैं’ असा जीवनप्रवास असणार्‍या स्त्रियांमध्ये तेज असते, ते मानवतेचा जागर करणार्‍या आत्मनिर्भरतेचे, आत्मविश्वासाचे आणि कृतिरूपी समाजशीलतेचे. स्वत्व जपत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्‍या या मातृशक्ती. त्यापैकीच एक आत्मनिर्भर समाजशील माधवी अरोलकर.
 
मुंबईच्या दादर परिसरात राहणार्‍या माधवी या एका नामांकित खासगी आस्थापनात चांगल्या हुद्द्यावर काम करतात. सिद्धिविनायक मंदिर परिसर गजबजलेला. इथे रस्त्यावर गजरे, हार, फुले विक्रेतेही मोठ्या संख्येने असतात. त्यांची मुलंही त्यांच्यासोबत असतात. पण, या मुलांच्या शिक्षणाचे काय? ते शिकणारच नाहीत, मग त्यांचे पुढचे भवितव्य काय? असा प्रश्न माधवी यांना पडला. पण, प्रश्न अनुत्तरित ठेवणे हा त्यांचा स्वभावच नाही. दिवसा ते पालक-बालक सगळे कामामध्ये. मग माधवी दिवसा न जाता रात्री त्या परिसरात जाऊ लागल्या. त्या पालकांना किमान गरजेपुरती अक्षरओळख यावी, मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांना जागृती व्हावी, यासाठी त्या पालकांचे समुपदेशन करतात. रस्त्यावर दिशाहीन भटकणार्‍या त्या बालकांचे भवितव्य दिशाहीन होऊ नये, यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.
 
अरविंद शिद्रुक आणि अंजू यांची लेक माधवी. हे कुटुंब मूळचे देवगडचे. मात्र, कामानिमित्त मुंबईच्या दादर परिसरात स्थायिक झालेले. अरविंद हे वाहन चालकाचे काम करायचे, तर अंजू या गृहिणी. आर्थिकबाबतीत घरची गरिबीच. त्या परिस्थितीमध्ये ती घटना घडली. परिसरात काहीतरी कार्यक्रम होता. किशोरवयीन माधवी ठेवणीतले कपडे घालून कार्यक्रमाला गेल्या. त्यावेळी कुणीतरी म्हटले, “चार वर्षे झाली, माधवी कार्यक्रमाला हा एकच पोशाख घालून येते. नवीन कपडे वगैरे घेतेस की नाही.” खरं तर याचे उत्तर ‘नाही’ असेच होते. त्यावेळी माधवी यांना खूप वाईट वाटले. गरिबीची आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिस्थितीची जाणीव पहिल्यांदाच झाली. दुःखाने त्यांनी आईला हे सांगितले. तर आई म्हणाली, “चार वर्षांपासून परिस्थितीमुळे आपण कुणीच नवीन कपडे घेतले नाही. कारण, आपली परिस्थिती नाही. पण, ही परिस्थितीही बदलेल. आपण आपले चांगले विचार आणि कष्टाने ही परिस्थिती पालटवू.” परिस्थिती पालटेल हा आशावाद घेऊनच माधवी यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित केले. शाळेत असताना त्या उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होत्या. त्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भाग घेतला. याच दरम्यान बाबांच्या मेहनतीने आणि आईच्या काटकसरीने घरची आर्थिक परिस्थिती पालटू लागली. माधवी यांनीही बारावीनंतर पोस्टाचे काम सुरू केले.
 
‘वाणिज्य’ शाखेच्या पदवी परीक्षेनंतर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर एका वर्षाच्या काळात अशा काही घटना घडल्या की, माधवी यांना विवाह टिकेल का? असे वाटू लागले. याच काळात त्यांना मातृत्वाची चाहुल लागली आणि श्रेयाचा जन्म झाला. लेकीसाठी माधवी यांनी संसार जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तो परत जोडला गेला नाही. सर्वार्थाने एकल पालकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली. मुलीचे संगोपन, शिक्षण उत्तम व्हावे, म्हणून त्यांनी कसलीच कसर ठेवली नाही. पण, हे सगळे काही सोपे नव्हते. हे सगळे करताना त्यांच्या मनात आले, “ईश्वराने आपल्याला शक्ती दिली की आपण सगळ्या समस्यांना तोंड देऊ शकतो. मात्र, सासर-माहेर नसलेल्या किंवा असूनही एकट्या निराधार असलेल्या महिलांना किती समस्या असतील? त्यांना साहाय्य कोण करणार?” याच विचारांनी २००९ सालापासून त्या समाजकार्य करू लागल्या.
 
परिसरात सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या समाजघटकांमधला शिक्षणाचा टक्का वाढावा, एकल पालक असलेल्या बालकांच्या शिक्षणातील आणि सर्वांगीण विकासातील अडसर दूर व्हावा, खर्‍या अर्थाने दुर्बल, निराधार महिलांच्या आयुष्यातील संघर्ष शिथील व्हावा, यासाठी माधवी काम करू लागल्या. “गरिबीमुळे चांगल्या घरातील मुलांच्या आयुष्याचा मार्गही काटेरी वणव्यातला होतो. त्यामुळे स्वावलंबन आणि त्यातून अर्थार्जन महत्त्वाचे आहे,” असे माधवी यांचे मत. त्यामुळेच त्यांनी परिसरातील अनेक होतकरू युवक- युवतींना त्यांच्या गुणवत्तेनुसार, कुवतीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा लोकसंपर्क दांडगा असल्यामुळे ‘आहे रे’ गटाच्या मदतीचा ओघ त्या ‘नाही रे’ गटापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या निस्वार्थी वृत्तीमुळे त्यांच्या एका हाकेवर सहकार्यासाठी लोक स्वतःहून पुढे येतात. त्या म्हणतात, “दुर्दैवाने रस्त्यावरचे जिणे नशिबी आलेल्या बालकांसाठी आणि एकल पालकत्व असलेल्या महिलांसोबतच शोषित-वंचित घटकांना प्रगतीसाठी साहाय्य होईल, असे कार्य आजीवन करायचे आहे.” या सगळ्या कामामध्ये त्यांना असंख्य अडचणी येतात.पण, सगळ्या प्रश्नांना त्या समर्थपणे तोंड देतात. वैयक्तिक दुःखाचा कोणताही बाऊ न करता, इतर दुःखी शोषित-वंचितांसाठी काम करणार्‍या माधवी अरोलकर यांचे विचारकार्य हे नाईलाजाने एकल पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार्‍या महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.