हसायला सर्वांनाच आवडते, रडण्याच्या नशिबी मात्र तिरस्कारच. मानवी आयुष्यात जसे सुख आणि दु:ख हे येतात, अगदी तसेच हसण्याबरोबर रडणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडे रडण्याला दुर्बलतेचे लक्षण मानल्याने, रडण्यातही लिंगभेद अनुभवायला मिळतो. मात्र, हे रडणे रोखले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम मानवी शरीर आणि मनावर होतात. या लेखातून या परिणामांबद्दल जाणून घेऊया...
अधारणीय शारीरिक वेगांच्या या लेखमालेच्या श्रृंखलेमध्ये पुढील एका वेगाबद्दल जाणून घेऊया, तो म्हणजे अश्रुवेग. बोली भाषेत सांगायचे झाले तर ’रडणे’ या वेगाबद्दल, थोडे सविस्तर आजच्या लेखातून जाणून घेऊया.
‘रडणे’ ही प्रक्रिया जरी दृश्य असली, (Tears, अश्रू निघताना दिसतात), पण त्याचे कारण नेहमी केवळ शारीरिक असेलच, असे नाही. बरेचदा भावनिक-मानसिक कारणांमुळेही व्यक्ती रडते. रडणे हा एकमेव भावनाप्रधान वेग, अधारणीय वेगांमध्ये समाविष्ट केला गेला आहे. अश्रू वाहणे हे जसे दुःखद प्रसंगामध्ये होते, तसेच आनंदाच्या-सुखाच्या क्षणीदेखील डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. त्यांना ‘आनंदाश्रू’ असे संबोधले जाते. मनातील भावनांच्या विविध छटांचे अश्रुमार्फत सादरीकरण होते. म्हणजे काय, तर व्यक्ती खूप दुःखी असली, शोकाकुल असली, तर ती रडते आणि आश्चर्यकारक आनंदी घटना (उदा. अंतराळातून सुनीता विल्यम्सचे यशस्वी पुनरागमन) असल्यासही अश्रुवेग उत्पन्न होतो. आनंदाच्या क्षणात किंवा अत्यंत राग आलेला असतानाही अश्रू वाहतात. त्याचबरोबर शारीरिक-मानसिक दुखापत, वेदना अथवा आघात झाल्यावरही व्यक्ती रडू लागते. सर्व सजीवांमध्ये मनुष्य एकमेव असा आहे, जो आनंद आणि दुःख दोन्हीच्या व्यक्ततेसाठी रडतो! मन जेव्हा हळवे होते, (चांगल्या, आनंदाच्या क्षणी, किंवा दुःखाच्या क्षणी) तेव्हा रडणे ही स्वाभाविक प्रक्रिया होते.
रडणे याचा संबंध आपल्या भावनांशी आहे आणि भावना (इमोशन्स) येतात, तिथे हार्मोन्सचा संबंध अवश्य येतो. रडतेवेळी ‘ऑक्सिटोसिन’ आणि ‘एंडोर्फिन्स’ बाहेर पडतात. मनातील उद्विग्नता, भडास रडून झाल्यावर कमी होते आणि मन शांत होते, हलके वाटू लागते, बरे वाटू लागते ही प्रक्रिया ‘ऑक्सिटोसिन’मुळे होते. ‘एंडोर्फिन्स’ हे नैसर्गिक वेदना स्थापक (नॅचरल पेन रिलिव्ह) आहेत. यामुळे वेदना (शारीरिक, मानसिक, भावनिक) व त्याची तीव्रता कमी होते. रडून झाल्यावर जरी वस्तुस्थिती बदलली नसली, तरी त्याची बोच बोथट होते, त्या वेदनेची तीव्रता/प्रखरता कमी जाणवते. म्हणजे रडल्यामुळे ज्या उत्कट भावनांचा उद्रेक झालेला असतो, त्यांना वाहून जाण्याची संधी मिळते. या सर्व कारणांव्यतिरिक्त अजून एक कारण आहे, जेव्हा डोळ्यांतून अश्रू वाहतात. ते म्हणजे, डोळ्यांत कचरा गेल्यास डोळ्यांना जेव्हा त्रास होतो, तेव्हा कचरा डोळ्यांतून काढण्यासाठी डोळ्यांत आपसूकच पाणी येते. एखाद्या गोष्टीकडे टक लावून बघितल्यासही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सकडे डोळे न मिचकावता बराच काळ बघितल्यास, डोळ्यांवर ताण येतो आणि मग डोळ्यांची उघडझाप केल्यावर डोळे पाणावतात. पण, या दोन्ही बाबींमध्ये डोळे फक्त ओलावतात, अश्रू खूप वाहात नाहीत.
अश्रुवेगधारण म्हणजे वाहणे थांबविणे, तीव्र अश्रूंचा वेग म्हणजे खूप रडावेसे वाटत असताना किंवा रडत असताना ते थांबविणे हे अपेक्षित आहे, फक्त डोळे पाणावणे एवढेच अपेक्षित नाही. आपण वरील विवेचनात बघितले की, रडणे ही एक प्रक्रिया आहे, शरीराची प्रतिक्रिया आहे. एखाद्या शारीरिक, भावनिक किंवा मानसिक क्रियेला रडणे हा एक प्रतिक्षेप अर्थात प्रतिसाद आहे. एखादी घटना आधी घडते आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणजे रडणे होय. जेव्हा क्रिया होते, तेव्हा प्रतिक्रिया तर असणारच! ती थांबविणे चुकीचे आहे. रडू येत असल्यास रडून घ्यावे, रडणे थांबवू नये. रडून झाले की, पुन्हा नाटकी मात्र रडू नये. कारण, नसल्यास सोंग आणण्यापुरते रडू नये. बरेचदा रडणे हे पुरुषी स्वभावाला साजेसे नाही, असे लहान मुलांच्या मनावर वारंवार बिंबविले जाते. रडणे हा मुलींचा स्वभाव, मुले रडत नाहीत इ. पण, शास्त्रात कुठेही असा उल्लेख नाही. मन जेवढे हळवे असते, तेवढे ते अधिक भावनाप्रधान असते आणि भावनाप्रधान व्यक्तींना भावना आवरणे कठीण होते. अशा व्यक्ती भावना सहजरित्या व्यक्त करतात. आनंदही तेवढाच चटकन दर्शवितात आणि राग-दुःखही. मनाचा हळवेपणा हा दोन्ही स्त्री-पुरुषांमध्ये कमी-अधिक प्रमाणात असतो. सर्वसाधारणपणे स्त्रिया अधिक हळव्या असतात पण, म्हणून मुलांनी-पुरुषांनी रडूच नये, आपल्या भावना व्यक्त करू नये, असे नाही. भावना रोखून ठेवल्यास आणि असे वारंवार केल्यास, त्याचा अनिष्ट परिणाम शरीरावर व मनावर दिसतो.
अश्रुवेग धारण करू नये, ना स्त्रियांनी ना पुरुषांनी. रडता-रडता रडणे अचानक बंद करणे हे चुकीचे आहे. रडावेसे वाटत आहे, पण रडायचे नाही सांगितल्यामुळे न रडणे, हेदेखील चुकीचेच आहे. रडता-रडता मध्येच जबरदस्तीने रडणेे थांबवले, तर डोळे व डोके जड होते. असे वारंवार झाल्यास डोळ्यांचे व डोक्याचे विविध आजार होऊ शकतात. मनावरील दडपण कमी करण्यासाठी व्यक्ती रडते. ते दडपण न रडल्यामुळे कमी होत नाही, त्या दडपणाचे ओझे मेंदूला व हृदयाला सर्वाधिक सोसावे लागते. परिणामी, असे वारंवार झाल्यास हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या तक्रारी सुरू होेऊ शकतात. मनावरच्या दडपणामुळे दैनंदिन जीवनातील रस-रुची कमी होते. कशातही मन लागत नाही. सतत विचारांमध्ये ती व्यक्ती मग्न राहाते. आसपासच्या चाललेल्या घटनांवर हवा तसा प्रतिसाद दिला जात नाही. कालांतराने त्यामुळे या काळातील घडलेल्या गोष्टींचा चटकन विसर पडतो. त्या कालखंडातील अन्य घडामोडींची स्मृती लवकर पुसट होते. रडणे थांबवल्यास, खांदे-मान या अवयवांवर जोर, भार येतो. मान-खांदे जड होतात, सांधे आखडतात, त्यामुळे हालचाली कठीण होतात.
रडणे अचानक थांबवल्यास, नाक अधिक वाहू लागते. ‘पीनस’ आणि ‘प्रतिश्याय’ हे दोन आजार रडणे थांबविल्यामुळे होतात. मनावरील नकारात्मक भावनांच्या दडपणामुळे क्वचितप्रसंगी, त्या व्यक्तीला चक्करही येऊ लागते. मनाला आवर घालणे म्हणजे, मनाच्या भावनांना दाबून टाकणे असा अर्थ होत नाही. आवर घालणे म्हणजे, मन जे सैरभैर भटकते आहे, त्याला नियंत्रित ठेवणे होय. पण, हल्ली रडणे हे कमीपणाचे, नाजूकपणाचे लक्षण मानले जाते आणि त्यामुळे रडावेसे वाटले तरी, त्या वेगाचे धारण केले जाते. असे बराच काळ जर झाले, तर मन बोथट होते आणि इतरांशी, आपल्या आसपासच्या व्यक्तींबरोबरही नात्यातील ओलावा, स्नेह कमी होऊ लागतो. मन आणि भावना दोन्ही कोरड्या होऊ लागतात, हे चांगले नाही.
अश्रुवेग धारण केल्यावर जर वरीलपैकी काही शारीरिक अथवा मानसिक तक्रारी अथवा आजार झाले, तर त्याची चिकित्सा अवश्य करावी. पण, त्याचबरोबर मनाच्या भावनांच्या ओलाव्यासाठीदेखील प्रयत्न करावा. अश्रुवेगधारणांच्या चिकित्सेमध्ये निद्रा येईल, मन शांत होईल, असे उपक्रम, चिकित्सा सांगितली आहे. यात सर्वांग अभ्यंग (संपूर्ण शरीराचा मसाज), पादाभ्यंग (तळव्यांना तेल लावणे), शिरोऽभ्यंग, शिरोधारा इ. काही आभ्यंतर औषधी चिकित्सेचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रियजनांच्या सहवासात राहावे, असेही सांगितले आहे. यामुळे आपल्या सर्वांत खोलवर असलेल्या भावनांचेही देवाणघेवाण होते आणि मनाला आलेला कोरडेपणा नाहीसा होतो. अश्रुवेगधारणेमुळे जो भावनांमध्ये कोरडेपणा, रुक्षता येेते, ती कमी करण्यासाठी क्वचितप्रसंगी वर्तवणूक संबंधी उपचार आणि उपायाचाही अवलंब करावा लागतो. त्यामुळे अश्रू या वेगाचे धारण करणे टाळावे. शरीर व मन जर सुदृढ हवे असेल, तर अधारणीय शारीरिक वेगांचे धारण करू नये. (क्रमश:)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९