आप सरकारच्या काळात दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक गाळात - मुख्यमंत्री रेखा गुप्ता
- डीटीसीविषयक कॅगचा अहवाल विधानसभेत सादर
25-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली: ( CM rekha gupta CAG report on DTC presented in the Legislative Assembly ) दारू आणि मोहल्ला क्लिनिकनंतर भाजप सरकारने दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) वरील कॅग अहवालही विधानसभेत सोमवारी सादर केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी दिल्ली विधानसभेत डीटीसी कॅग अहवाल सादर केला.
कॅगच्या अहवालात आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या कार्यकाळातील डीटीसीमधील अनेक कमतरता नमूद करण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले आहे की २०१५ ते २०२३ दरम्यान बसेसची संख्या कमी झाली आणि त्यामुळे नफा मिळवणे तर दूरच, कोणत्याही मार्गावर ऑपरेटिंग खर्चही वसूल होऊ शकला नाही. कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, ८ वर्षांत डीटीसीच्या सुमारे ४०० बसेस कमी करण्यात आल्या. २०१५-१६ मध्ये डीटीसीकडे ४३४४ बस होत्या, ज्या २०२२-२३ मध्ये ३९३७ पर्यंत कमी झाल्या. निधी उपलब्ध असूनही महामंडळ २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये केवळ ३०० इलेक्ट्रिक बस खरेदी करू शकले.
कॅगला असे आढळून आले की २०१५-२२ मध्ये जुन्या बसेसची संख्या ०.१३ टक्क्यांवरून (५ बसेस) १७.४४ टक्के (६५६ बसेस) वाढली आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत ती ४४.९६ टक्के (१७७०) झाली. नवीन बस खरेदी करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले नाहीत तर हा आकडा आणखी वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की डीटीसी कोणत्याही मार्गावरील त्यांचे ऑपरेटिंग खर्च भागवू शकत नाही. २०१५ ते २०२२ दरम्यान, डीटीसीला १४१९८.८६ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा झाला.