कर्तव्यपथा'वरुन सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल! प्रत्येकाला न्याय मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आ. प्रविण दरेकरांच्या कार्यालय उदघाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

    25-Mar-2025
Total Views |
 
CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office
 
 
मुंबई : ( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
चर्चगेट येथील के. सी. कॉलेज समोर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या 'कर्तव्यपथ' कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, आ. स्नेहा दुबे, आ. श्रीकांत भारतीय, आ. राजहंस सिंह, आ. उमा खापरे, आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे नरेंद्र पाटील, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले, नितीन बनकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
 
'कर्तव्यपथ' कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आ. प्रविण दरेकरांनी खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. विशेषतः त्यांची मेहनत करण्याची प्रचंड तयारी आहे. राजकीय, गृहनिर्माण किंवा सहकार क्षेत्र असो त्यांच्या आवडीचे विषय आले कि ते समोर असतात. विशेषतः मुंबईतील सामान्य मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी किंवा गृहनिर्माण संस्थांमधील लोकांसाठी त्यांनी केलेलं काम मोलाचे आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी हे कार्यालय उघडण्यात आलेय. त्याचे नावही 'कर्तव्यपथ' ठेवले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जे मिळालेय ते स्वीकारून जीवनाच्या कर्तव्यपथावर चालत रहा, असा संदेश देणाऱ्या कवितेच्या ओळींचा उल्लेख केला. ते म्हणाले कि, 'क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै, जीवन के कर्तव्यपथपर वो भी मिला, जो भी मिला, ये भी सही, वो भी सही.' याच भावनेतून हे 'कर्तव्यपथ' तयार झालेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला.
 
तत्पूर्वी बोलताना आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, मी आज राजकारणात, सहकारात जे काही करतोय, योजना आणतोय या सर्वांच्या मागे देवाभाऊंचा आशीर्वाद आहे. हे कार्यालय उघडण्याचे कारण म्हणजे मुंबई बँकेत राज्यभरातून सहकार संबंधी लोकं, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते येऊन भेटायचे. त्यामुळे बँकेचे काम होत नव्हते. यासाठी सर्व यंत्रणासहित हे कार्यालय उघडले आहे. या कार्यालयाचे नाव 'कर्तव्यपथ' दिलेय. या कर्तव्यपथावरून महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कर्तव्य तुमचा शिलेदार म्हणून पार पाडीन, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली मनोगते व्यक्त करत नवीन कार्यालयासाठी दरेकरांना शुभेच्छा दिल्या.