विल्यम शेक्सपियर हा नाटककार प्रत्येक पिढीला नव्याने उलगडत जातो. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’पासून ते अगदी विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या सिनेमापर्यंत, शेक्सपियरच्या लिखाणाची जादू लोकांना नव्याने अनुभवायला मिळते. प्रायोगिक रंगभूमीच्या विश्वात शेक्सपियरच्या लिखाणाचे नवनवीन अर्थ लावले जातात. मानवी वर्तनाचे विलक्षण पैलू शेक्सपियरच्या लिखाणात आपल्याला सापडतात. परंतु, याच शेक्सपियरचा वापर सांस्कृतिक वर्चस्ववाद प्रस्थापित करण्यासाठी, काही शतकांपूर्वी सुरू झाला होता. हाच सांस्कृतिक वर्चस्ववाद पुसण्यासाठी, शेक्सपियरच्या मायभूमीमध्ये आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
शेक्सपियरचे जन्मस्थान जतन करणार्या संस्थेने, ‘बर्मिंगहॅम विद्यापीठा’सोबत केलेल्या एका संशोधनात्मक अभ्यासानंतर हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यांच्या संशोधनातून असा निष्कर्ष निघाला की, शेक्सपियरच्या लिखाणाचा वापर करून जाणीवपूर्वक इंग्रजांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद प्रस्थापित करण्यात आला. शेक्सपियरचे जन्मस्थान असलेल्या ‘स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉन’ इथल्या या संस्थेला, आता शेक्सपियरच्या लिखाणातील वसाहतवादी प्रभाव दूर करून, त्याच्या साहित्याचे सर्वसमावेशक आकलन व्हावे, यासाठी ते कार्यरत आहेत. वसाहतवादाचा प्रभाव दूर करणे, म्हणजे शेक्सपियरच्या साहित्यातील वंशवादी, समलैंगिकताविरोधी भाषा किंवा चित्रणे, यांचा काळाच्या ओघात पुर्नविचार करणे. शेक्सपियरचे निवासस्थान म्हणजे, त्याच्यावर प्रेम करणार्या लोकांचे श्रद्धास्थान आहे. इंग्लंडमधील वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी काळाच्या ओघात, शेक्सपियरशी संबंधित अनेक मौल्यवान गोष्टी, त्याच्या निवासस्थानी संस्थेकडे सुपूर्द केल्या. जगाच्या पाठीवर विविध देशातील लोकांनी त्याच्या जन्मस्थळाला भेट देत, काही ना काही भेटवस्तू दिलेली आहे. या सर्व भेटवस्तूंचे जतन करताना, शेक्सपियरच्या लिखणाचे पुनरावलोकन व्हावे; परंतु त्यामुळे इतर कुठल्याही संस्कृतीचा अपमान होता कामा नये, असा सर्वसमावेशी विचार या संस्थेने करण्याचे ठरवले आहे.
एकेकाळी इंग्लंडच्या वसाहतवादी धोरणामुळे, अनेक देशावर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली. भारतामध्ये ज्याप्रकारे इंग्रज व्यापारासाठी आले, त्याचप्रकारे व्यापाराच्या उद्दिष्टाने अनेक देश काबीज करण्याचा प्रकार १६व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. टप्प्याटप्प्याने राजकीय सत्ता हस्तगत करत, इंग्रजांनी अनेक मुलुख बळकावले. इंग्रजांच्या सत्ताकाळात त्या त्या राष्ट्रांची सर्वतोपरी पिळवणूक झाली. आर्थिकदृष्ट्या ही राष्ट्रे कमकुवत होत गेली. परंतु, दुसर्या बाजूला हे आक्रमण सांस्कृतिकही होते. सांस्कृतिकदृष्ट्या इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, इंग्लंडमधील अनेक लेखकांनी वसाहतवादाचे समर्थन केले. इंग्रजीमध्ये याला ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ असे संबोधण्यात आले. ज्या ज्या भूप्रदेशावर इंग्रजांनी सत्ता काबीज केली, तिथल्या लोकांना माणसात आणायचे ईश्वरी कार्य इंग्रजांच्या हवाली केले आहे असा यामागचा विचार होता. हा विचार समजून घेतल्यास, भारतीय शिक्षण संस्कृतीचा र्हास नेमका का घडवून आणला? हे आपल्या लक्षात येईल. इंग्रजी संस्कृतीचे व साहित्याचे उदात्तीकरण करता करता, त्या त्या प्रदेशातील संस्कृतीचे महत्त्व कमी करण्याचा सुप्त प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारतासह अनेक देशांमध्ये याबद्दल विचारविमर्श करण्यात आला. काळाच्या ओघात इंग्रजांच्या अधिपत्याखाली असणारी राष्ट्रे स्वतंत्र झाली. परंतु, इंग्रजी साहित्य, संस्कृतीपासून ते इंग्रजी जीवनपद्धतीचा प्रभाव मात्र कायम राहिला. वर्तमानात याच प्रभावांचा पुनर्विचार केला जातो आहे. वसाहतवादाचा अनैसर्गिक पगड दूर सारून, त्या त्या कलाकृतींना त्यांच्या अस्सल रूपात समजून घेण्याचे काम सुरू आहे.
कलाकाराची अभिव्यक्ती बव्हंशी स्वतंत्र असते. तिचा स्वतःचा एक नैसर्गिक प्रवाह असतो. हा प्रवाह जनमानसाला प्रभावित करतो. परंतु, जेव्हा त्या कलाकाराच्या अभिव्यक्तीवर स्वार होऊन सत्ताधारी गट वर्चस्ववाद निर्माण करतो, तेव्हा अभिव्यक्तीचे गुणात्मक मूल्य हरवते. हे मूल्य एकदा हरवले की, सांस्कृतिक संघर्ष उभा राहतो. यामध्ये श्रेष्ठत्वाच्या लढाया सुरू होतात, ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही. येणार्या काळातसुद्धा, शेक्सपियरच्या लिखाणाचे गारुड जनमानसावर असेल यात शंका नाही. परंतु, त्या वेळेस त्याच्याभोवती गुंफलेले वसाहतवादाचे आवरण नाहीसे झालेले असेल, हे महत्त्वाचे.