ज्येष्ठ साहित्यीक विनोद कुमार शुक्ल यांचे प्रतिपादन
24-Mar-2025
Total Views | 14
मुंबई : "मला जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान मला जबाबदारीची जाणीव करून देतो " असे मत हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कवी विनोद कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. भारतामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार, या वर्षी हिंदी साहित्याचे ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. 'नौकर की कमीज, दिवार में एक खिडकी रहती थी' अश्या दर्जेदार साहित्यकृतीमुळे शुक्ल यांचे जगभरात कौतुक करण्यात आले. १९७१ साली 'लगभग जयहिंद' हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रीया देताना विनोद कुमार शुक्ल म्हणाले " माझ्याकडे लिहीण्यासारखं बरंच काही आहे, पण त्यातलं सुद्धा फार थोडं लिखाण माझ्याकडून झालं. मी आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बघितल्या. खूप काही एकलं, अनेक गोष्टींची अनुभूती घेतली. पण त्यातील फार कमी गोष्टींचं रूपांतर लिखाणामध्ये झाले." १९३७ साली छत्तीसगढच्या राजनंदगाव येथे विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यीक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या लेखणीने विनोद कुमार शुक्ल यांना प्रभावित केले. साहित्य अकादमीसह अनेक पुरस्करांनी विनोद कुमार शुक्ल यांचा सन्मान करण्यात आला.