सांगलीत ‘अर्बन हॉर्नबिल वॉच’

    24-Mar-2025
Total Views |

article provides information about urban hornbill watch initiative
 
 
शहरी भागात नांदणार्‍या पक्ष्यांच्या काही प्रजाती असल्या, तरी यापूर्वी हरित क्षेत्रात आढळणार्‍या मात्र आता शहरी अधिवासाशी जुळवून घेतलेल्या काही प्रजाती आहेत. भारतीय राखी धनेश हा त्यामधीलच एक पक्षी. सांगलीतील शहरी भागात नांदणार्‍या या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
 
जंगलात आढळणार्‍या फलाहारी पक्ष्यांपैकी सर्वांत मोठा पक्षी म्हणजे धनेश. भारतामध्ये धनेशाच्या नऊ प्रजाती आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रामध्ये राखी धनेश (Indian Grey Hornbill), मलबारी राखी धनेश (Malabar Grey Hornbill), मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) आणि सर्वांत मोठा महाधनेश (Great Hornbill) या चार प्रजाती आढळतात. स्थानिक भाषेमध्ये घाटप्रदेशात याला धनेश, धनछडी किंवा शिंगचोच्या नावाने ओळखले जाते. नावाप्रमाणेच त्याच्या मोठ्या चोचीवर शिंगासारखा दिसणारा उभार आलेला असतो. प्रामुख्याने फळे खाणारा हा पक्षी बीजप्रसाराचे महत्त्वाचे काम करतो. जंगलामधील भेरली माड, अंजीर, जायफळाच्या प्रजाती, बलगे आणि इतर फळे हे त्याचे मुख्य अन्न आहे. धनेशाच्या विष्ठेतून पडणार्‍या या फळांच्या बिया जंगलात इतर ठिकाणी रुजतात आणि जंगल वाढायला मदत होते. भारतात आढळणार्‍या धनेशाच्या सर्वच प्रजाती काही ना काही कारणाने धोक्यात आहेत. शिकार, अधिवासाचा र्‍हास, घरटी करण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी लागणार्‍या उंच, जुन्या झाडांची तोड या कारणांमुळे धनेशाचे स्थानिक अस्तित्व नष्ट होत आहे.
 
महाराष्ट्रात सापडणार्‍या चारही प्रजातींपैकी राखी धनेश हा मानवी वस्तीजवळ सापडणारा एकमेव धनेश आहे. गावांमधील मोठ्या, जुन्या झाडाच्या ढोलीमध्ये धनेशाचे वैशिष्ट्यपूर्ण घरटे असते. विणीच्या हंगामात (हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होताना) मादी ढोलीच्या आत जाते. ढोलीचा प्रवेश चिखल, विष्ठा यांच्या साहाय्याने बंद करून घेतला जातो. फक्त चोच बाहेर येईल, एवढीच फट ठेवली जाते. ढोलीमधील पिल्ले मोठी होईपर्यंत मादी व पिल्लांची देखभाल नर करतो. मादी एकावेळी एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते.
 
धनेश स्वतः ढोली बनवू शकत नाही. इतर पक्ष्यांनी बनवलेल्या ढोलीचा अथवा नैसर्गिक ढोलीचा वापर तो करतो. मानवी वस्तीमध्ये मुळातच जुन्या, मोठ्या झाडांची कमतरता, त्यात ढोली असणारे झाड शोधायचे मोठे काम राखी धनेशाच्या जोडीला करावे लागते. शहरातील मोठी झाडे अडथळा रिकामा करण्यासाठी हमखास तोडली जातात. नव्या इमारती, रस्ते बांधताना वृक्षांचा सर्रास बळी दिला जातो. हे वृक्ष कापताना त्यावर कोण अवलंबून आहे, याचा विचार क्वचितच केला जातो. घरटी करण्यासाठी जागाच नसेल, खाण्यासाठी फलधारी झाडेच नसतील, तर त्या भागातील धनेश निघून जातो.
 
शहरांमधील राखी धनेशाचे अस्तित्व वायचवायचे असेल, तर त्याच्याबद्दल शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. या अभ्यासात स्थानिक नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, तर या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याबद्दल जनजागृती करणे सोपे जाईल. हाच विचार घेऊन सांगलीमध्ये ‘बर्डसाँग’ ही निसर्ग अभ्यास करणारी संस्था आणि ‘अर्बन हॉर्नबिल वॉच’ या प्रकल्पांतर्गत ‘हॉर्नबिल रेस’चे आयोजन केले आहे.
 
अर्बन हॉर्नबिल वॉच
 
मानवी वस्तीजवळ अस्तित्व असणार्‍या राखी धनेशचा शास्त्रीय अभ्यास नागरिकांच्या सहभागातून व्हावा, यासाठी ‘अर्बन हॉर्नबिल वॉच’ या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्वरूपात सांगली येथे सुरू आहे. सांगली शहरातील राखी धनेशाची सद्य परिस्थिती काय आहे, नेमकी संख्या किती आहे, घरटी करण्यासाठी ढोली असणारी झाडे कोणती आहेत, शहरात आणि शहराच्या बाहेर फलधारी वृक्ष कोणते व किती आहेत, शहरातील धनेशाच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल झाले आहेत का, अशा प्रश्नांची उत्तरे या अभ्यास प्रकल्पातून शोधली जाणार आहेत.
काय आहे ‘हॉर्नबिल रेस’
  • ‘अर्बन हॉर्नबिल वॉच’ या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांच्या सहभागातून गोळा केली जाईल.
  • सांगली शहर आणि हरिपूर गावातील राखी धनेशाची सद्यस्थिती काय आहे?
  • धनेशाला घरटी करण्यासाठी लागणारी उंच, जुनी झाडे कोठे आहेत?
  • फळधारी झाडे कोणती व कुठे आहेत?
  • घरट्याच्या जागा (ढोली) असणार्‍या झाडांना भविष्यात धोका आहे का?
 
काय करायचे आहे
  • दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ११ या वेळेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व हरिपूर क्षेत्रात तुम्हाला दिसलेल्या धनेशाच्या संख्येची नोंद करायची आहे.
  • हा उपक्रम सांघिक असणार आहे. प्रत्येक संघामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार सहभागी असावेत.
  • प्रत्येक संघातील एका सदस्याने ए-BIRD या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर चेकलिस्ट बनवायची आहे.
  • रेसदरम्यान काढलेले धनेशाचे फोटो I-NATURALIST या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर अपलोड करायचे आहेत.
  • धनेशाचा अधिवास, घरटे यांना धोका पोहोचेल, असे कोणतेही कृत्य, फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत व तत्काळ संघ बाद केला जाईल.
  • जो संघ जास्तीत जास्त संख्या नोंदवेल, तो विजेता घोषित केला जाईल व बक्षीसपात्र राहील.
  • आयोजकांशी संपर्क साधून कृपया अधिक माहिती घ्यावी.
 
 
निनाद गोसावी