शैक्षणिक क्षेत्रात गेली १८ वर्षे योगदान देताना सामाजिक जबाबदारीचे भान राखत, नेहमी वेगवेगळे प्रयोग करून आपले वेगळेपण जोपासणार्या अमोल सूर्यकांत पोतदार यांच्याविषयी...
अमोल यांचा जन्म टिटवाळा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण वाडा तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात झाले. शालेय जीवनात असताना त्यांनी रा. स्व. संघाच्या शाखेत नित्याने उपस्थिती लावली. पुढे कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातून त्यांनी हिंदी विषयातून पदवी प्राप्त केली. पदवीनंतर त्यांना २००० साली नोकरीची संधी चालून आली. एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक या पदावर ते रुजू झाले. त्यांना शिक्षणाची आवड असल्याने, नोकरी करत आधी ‘एमए’ आणि मग ‘एमबीए मार्केटिंग’ असे शिक्षण त्यांनी घेतले. तसेच, त्यांना सहकार क्षेत्राची आवड असल्याने ‘जीडीसीए’ व ‘एनसीसी नेव्ही’चे पाच वर्षांचे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले.
अमोल यांना समाजकारणाचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाले. नोकरी निमित्ताने डोंबिवलीमध्ये आल्यावर डोंबिवली शहरालाच आपली कर्मभूमी बनवण्याचे, अमोल यांनी मनोमन ठरवले . त्यातूनच २००७ मध्ये त्यांनी डोंबिवलीत स्वतःच्या ‘रिअल अॅकेडमी’ या शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. १८ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेली १८ वर्षे सातत्य पूर्ण योगदान देत ‘रिअल अॅकेडमी’च्या डोंबिवली, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण १२ शाखा सुरु करण्यात अमोल यांना यश लाभले आहे.
सुरुवातीच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करताना इतरांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अमोल यांना या क्षेत्रात रुची निर्माण झाली. २००७ साली ‘रियल अॅकेडमी’ची स्थापना केल्यानंतर, त्यांना डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळत होता. पुढे २०१० मध्ये अमोल यांची ओळख दिवंगत शिक्षण महर्षी प्रा. सुरेंद्र बाजपेयी यांच्याशी झाली. अमोल यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘करिअर गाईडन्स’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थितांची गर्दी पाहून बाजपेयी यांनी अमोल यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत, “आज काल ऐकण्याच्या कार्यक्रमाला अशी गर्दी पाहायला मिळत नाही. तु आणि तुझी टीम होतकरू आहात, संस्थेच्या शाखांच्या विस्ताराबद्दल विचार कर,” असा त्यांनी सल्ला दिला. बाजपेयी यांच्या प्रोत्साहनामुळेच संस्थेच्या शाखांचा विस्तार झाल्याने, आपल्या यशात बाजपेयी सरांचा सिंहाचा वाटा असल्याचे अमोल सांगतात.
अमोल यांनी व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून झेप घ्यायचे ठरवले. त्यावेळी त्यांना ठाणे आणि दादर ही दोन नावे खुणावत होती. यावर काम करण्यात दोन वर्षे गेली. त्या दरम्यान बाजपेयी यांनी “तुझ्या कामाची आणि गुणवत्तेची गरज ग्रामीण भागाला आहे, तिकडे तुला सन्मान मिळेल,” असा मोलाचा सल्ला दिला. शेवटी अमोल यांनी आपल्या संस्थेची पहिली शाखा शहापूर येथे २०१२ साली सुरू केली. अर्थात त्याचे उद्घाटन बाजपेयी यांच्या हस्तेच करण्यात आले. त्यांनी अमोल यांना २०१५ सालापर्यंत ‘रियल अॅकेडमी’च्या दहा शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट दिले आणि अमोल यांनी पुढील दहा वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण केले. व्यवसाय जोमात सुरू असताना, अमोल यांनी बाजपेयी यांच्यासोबत संपर्क कायम ठेवला. त्यांच्या घरी नित्याने येणे-जाणे, डोंबिवलीतील विविध कार्यक्रमांत त्यांच्यासोबत उपस्थित राहणे, यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला.
नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अमोल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ‘भारत विकास परिषद’, ‘मराठी विज्ञान परिषद’, ‘नागरी अभिवादन न्यास’ आणि नंतर ‘लायन्स क्लब ऑफ डोंबिवली’ यांसारख्या संस्थांशी नाते जोडले. ‘लायन्स क्लब’चे अध्यक्षपद भूषवताना, त्यांनी विविध सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. अमोल यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे तसेच, सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मरणार्थ ‘डोंबिवली टॅलेन्ट हन्ट’ ही स्पर्धा भरवणे असे अनेक कार्यक्रम सुरु केले. गेली १२ वर्षे ही स्पर्धा सुरू असून, डोंबिवलीमधील बहुसंख्य शाळा यामध्ये सहभागी होतात. बाजपेयी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, माधव जोशी, मधुकर चक्रदेव यांनी अमोल यांना मार्गदर्शन करत आधार दिला. डोंबिवलीतील एक व्यावसायिक म्हणून नव्हे, तर एक सहृदय व्यक्ती म्हणून अमोल यांना सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कामांचे निमंत्रण येते आणि मोठ्या उत्साहाने ते देखील हजर राहतात.
‘रियल अॅकेडमी’ला केवळ एक कोचिंग क्लास म्हणून मर्यादित न ठेवता, कोरोना काळापासून त्यांनी ‘रियल डिजिटल’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचीही सुरुवात केली. आपल्या सर्व शाखांमध्ये त्यांनी ‘स्व. बाजपेयी विद्यार्थी दत्तक योजना’ सुरू केली. त्याअंतर्गत शहापूर तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांना ‘रियल’मध्ये मोफत शिक्षण दिले जाते. तसेच, प्रत्येक शाखेतील गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थितीच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद खोलीत अथवा पुस्तकात अडकून राहू नये, यासाठी त्यांनी ‘अॅक्टिव्हिटी अॅण्ड प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’सारखी अभिनव योजना सुरू केली. २०२० साली ‘अॅडव्हीज लर्निंग’सारख्या मोबाईल अॅपची निर्मिती केली.
‘रियल अॅकेडमी मधून बारावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासाठीच अमोल पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ साली ‘रियल अॅकेडमी’च्या माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था ‘रिअॅल्युमनी फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली. आज चार शहरांमध्ये ५०० हून अधिक ‘रियल अॅकेडमी’चे माजी विद्यार्थी या संस्थेत कार्यरत असून, अमोल हे एक भक्कम आधारवड बनून संस्थेच्या पाठीशी उभे आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील गेल्या १८ वर्षांच्या वाटचालीत अमोल यांना ‘नागरी अभिवादन न्यास’तर्फे ‘युवा चैतन्य पुरस्कार’, ‘वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट’चा ‘आरोग्य सेवाव्रती पुरस्कार’ यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात दर्जेदार शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याचे अमोल यांचे स्वप्न आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा!