‘बुलिया’ चा आवाज ऐकणार कोण?

निळ्या देवमाशाच्या शोधात : भाग - ५

    24-Mar-2025
Total Views |

article about the bulia porpoise
 
गेल्या भागात आपण लांब चोचीच्या सामान्य डॉल्फिनविषयीची माहिती जाणून घेतली. आज या डॉल्फिनपेक्षाही लहान असणार्‍या आणि समुद्रात लपूनछपून अधिवास करणार्‍या ‘बुलिया’ म्हणजेच ‘पॉरपॉईज’ या सागरी सस्तन प्राण्याविषयी माहिती जाणून घेऊया...
 
‘पॉरपॉईज’ म्हणजेच ‘बुलिया’ हा सागरी सस्तन प्राण्यांपैकी एक. जगभरात फोसीनिडे कुळात आढळणारे सात जातीचे ‘पॉरपॉईज’ समुद्रात विचरण करतात. यांची लांबी साधारण २.५ मीटरपेक्षा कमी असते. या सर्व जातीचे ‘पॉरपॉईज’ बहुधा उथळ किनारी सागरी क्षेत्रात वावरत असतात. याला अपवाद म्हणजे ‘डॅल्स पोर्पोईस’ आणि डोळ्यांभोवती चष्म्यासारखी दिसणारी काळी वर्तुळे असलेले ‘स्पेकट्याक्लेटेड पॉरपॉईज.’ या दोन्ही जातींचे ‘पॉरपॉईज’ भारतीय सागरी क्षेत्रात आढळत नाहीत. याशिवाय ‘हार्बर पॉरपॉईज’ ही जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणात दिसणारी ‘पॉरपॉईज’ची प्रजात आहे. विशेष बाब म्हणजे, यांचा आकार हा जगातील लहान सागरी सस्तन प्राण्यांमधील एक आहे.
 
‘बर्मिस्टरचा पॉरपॉईज’ (Burmeister's Porpoise) हा सागरी सस्तन प्राणी हरमन बर्मिस्टर या जर्मन प्राणिशास्त्रज्ञाच्या नावावरून ओळखला जातो. हा ‘पॉरपॉईज’ दक्षिण अमेरिकेच्या किनार्‍यांवर, विशेषतः अर्जेंटिना, ब्राझील, चिली आणि पेरू येथील थंड आणि समशीतोष्ण पाण्यात आढळतो. दक्षिण चिलीमध्ये खेकडे पकडण्याचा चारा किंवा गळात वापरण्यासाठी याला बंदुकीच्या गोळ्या आणि हार्पून्सच्या मदतीने मारले जाते. तसेच, पेरू देशाच्या आजूबाजूला सागरी क्षेत्रात हा मासेमारी करताना बर्‍याच वेळा अडकला जातो. या प्राण्यांचा जाणूनबुजून शार्क किंवा मोरी माशाचा चारा किंवा गळ म्हणून किंवा मानवी उपभोगासाठीही शिकार केली जाते. वाकिता (Vaquita) हे जगातील सर्वांत धोक्यात असलेले सागरी सस्तन प्राणी आहे. १९९६ मध्ये ‘आययूसीएन’च्या अहवालात प्रथम या प्रजातीला ’गंभीरपणे संकटग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात आले होते. हे छोटे आकाराचे ‘पॉरपॉईज’ मेक्सिकोच्या कॅलिफोर्निया आखातात आढळतात. परंतु, ‘सी शेपर्ड’ या जगविख्यात सागरी सांशोधन करणार्‍या संस्थेने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जगभरात निव्वळ दहा ते १३ वाकिता ‘पॉरपॉईज’ शिल्लक असल्याचे नमूद केले आहे.
‘नॅरो-रिज्ड फिनलेस पॉरपॉईज’ची (Narrow-Ridged Finless Porpoise) यांगत्झी उपप्रजाती (Yangtze subspecies) ही तिच्या नैसर्गिक आवासात ‘बाईजी डॉल्फिन’ (Baiji Dolphin) या दुसर्‍या एका सागरी सस्तन प्राण्याबरोबर राहात होती. परंतु, २००६ मध्ये ‘बाईजी डॉल्फिन’च्या अस्तित्वाचा नाश झाल्यानंतर, ही ‘फिनलेस पॉरपॉईज’ आता यांगत्झी नदीतील एकमेव सागरी सस्तन प्राणी राहिली आहे. ‘नॅरो-रिज्ड फिनलेस पॉरपॉईज’ ही प्रजात अगदी अलीकडे, २००८ मध्ये ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज’पासून (Indo-Pacific Finless Porpoise) वर्गीकरणात वेगळी करण्यात आली. या प्रजातीच्या N.A. asiaorientails आणि N.a. sunameri या दोन उपप्रजाती आहेत.
 
महाराष्ट्रात पालघर, रायगड आणि रत्नागिरी सागरी क्षेत्रात ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज’ जातीचे ‘पॉरपॉईज’ मोठ्या प्रमाणत वर्षभर मासेमारी जाळ्यात अडकले जातात. सुदैवाने येथील कुठलाच मच्छीमार समाज याची जाणीवपूर्वक शिकार करत नाही, तर देवाचे प्रतीक म्हणून बर्‍याच ठिकाणी त्याला पूजले जाते किंवा अंतर राखले जाते. वर्ष २०२४ मध्ये केतकी जोग आणि इतर संशोधक चमूने प्रकाशित केलेल्या संधोधन लेखानुसार राज्यात सिंधुदुर्गच्या सागरी क्षेत्रात ४० पेक्षा अधिक वेळा ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज’ची नोंद केली आहे. २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपत्रात, इशा बोपर्डीकर आणि तिच्या संघाने ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज’ या सागरी सस्तन प्राण्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या अभ्यासाचा परिचय दिला आहे. संशोधकांनी सिंधुदुर्ग किनार्‍यावर ३७६ चौ. किमी क्षेत्रात ध्वनिक (Acoustic) आणि दृश्य (visual) सर्वेक्षण पद्धतींचा एकत्रित वापर केला. अभ्यासात आढळले की, ध्वनिक पद्धतीने फिनलेस पॉरपॉईजचा शोध घेण्याचा दर (०.१२ गट/किमी) दृश्य पद्धतीपेक्षा (०.०३ गट/किमी) लक्षणीयरित्या जास्त होता. याशिवाय, किनार्‍यापासूनचे अंतर आणि पाण्याची खोली हे घटक ध्वनिक शोधासाठी महत्त्वाचे ठरले. हे निष्कर्ष सांगतात की, या प्रजातीच्या सर्वेक्षणासाठी ध्वनिक आणि दृश्य पद्धतींमधील प्रजाती-विशिष्ट फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. हा अभ्यास फिनलेस पॉरपॉईजच्या संरक्षणासाठी नवीन मार्गदर्शन प्रदान करतो. शेवटी लपून-छपून आपले अस्तित्व टिकवणार्‍या या प्राण्याबद्दल आपण एवढे करू शकतो की, जबाबदारीने मासेमारी करणे आणि याबद्दल एक सामान्य व्यक्ती म्हणून अधिक माहिती मिळवत राहणे.
 
महराष्ट्रातील इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज
 
या प्रजातीला जुने नाव ‘फिनलेस ब्लॅक पॉरपॉईज’ (Finless Black Porpoise) असे म्हटले जात असे. ही प्रजाती इंडो-पॅसिफिक प्रदेशातील किनार्‍यांवर आणि गोड्या पाण्यात आढळते. या पॉरपॉईजमध्ये पंख-पाठीवर पर नसल्यामुळे ते त्यांच्या इतर सागरी सस्तन प्राण्यांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांचा रंग सहसा निळसर-राखाडी असतो आणि ते सहसा एकटे किंवा छोट्या गटांमध्ये आढळतात. भारतीय सागरी क्षेत्रात आपल्याला फक्त याच जातीचे पॉरपॉईज दिसून येतात. इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईजचे (Indo-Pacific Finless Porpoise) आवास क्षेत्र पश्चिमेकडे पर्शियन आखातापासून सुरू होते आणि आशियाच्या किनार्‍याला लागून पूर्वेकडे वाढते. हे क्षेत्र उत्तर हिंदी महासागराच्या किनार्‍यांवरून सुमात्रा, जावा, बोर्निओ, कंबोडिया, व्हिएतनाम आणि दक्षिण चीनपर्यंत पसरलेले आहे. या प्रजातीला सहसा किनार्‍याजवळील उथळ पाण्यात आणि काही वेळा गोड्या पाण्यातही आढळते.
 
आढळक्षेत्र
 
या प्रजातीला उथळ किनारी पाणी आवडते. विशेषतः नदी मुख आणि आणि कांदळवन असलेले चिखलाचे परिसर. त्यांना मऊ किंवा वालुकामय तळाशी असलेले क्षेत्र विशेष आवडते. पालघरच्या झाईपासून सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यापर्यंत किनारी भागात बर्‍याच वेळा हे दिसतात. विविध नावांनी मच्छीमार समाज यांना ओळखतो. पालघरमधील वेती आणि मांगेला समाजातील मच्छीमार बांधव याला ‘बुलिया’ असे संबोधतात, तर पालघरमधील मांची मच्छीमार समूह याला कुत्ता मासा किंवा ’बलगा’ असे म्हणून ओळखतो. रायगड, मुंबई आणि रत्नागिरी ते पुढे सिंधुदुर्गपर्यंत बहुसंख्य मच्छीमार समाज याला ’बलगा’ किंवा ‘बुलिया’ किंवा ’बुल्गा’ म्हणून ओळखतात.
 
शारीरिक वर्णन
 
पाठीवरील पंख-पर नसणे, या प्रजातीमध्ये पाठीवर पंख (Dorsal Fin) नसते. त्याऐवजी, त्यांच्या पाठीवर एक रुंद डोर्सल रिज (Dorsal Ridge) असते. डोर्सल रिज ही रिज सुमारे ३.५ ते १२.० सेंमी रुंद असते आणि त्यावर दहा ते २५च्या संख्येने ट्यूबरकल्स (उंचवटे) असतात. त्यांचा रंग सहसा निळसर-राखाडी असतो, जो त्यांना पाण्यात लपून राहण्यास मदत करतो. याच शारीरिक आकार, रंग यांमुळे त्यांना सर्वेक्षण करताना पाहणे किंवा त्याचा फोटो काढणे हे अधिक आव्हानात्मक ठरते.
 
आहार
 
इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हे मांसाहारी प्राणी आहेत आणि त्यांचा आहार प्रामुख्याने लहान मासे, स्क्विड आणि क्रस्टेशियन्स (कठीण कवच असलेले प्राणी) यावर अवलंबून असतो. त्यांचे हे आहार त्यांना किनार्‍याजवळील उथळ पाण्यात सहज उपलब्ध होतात.
 
प्रदीप चोगले
 
(लेखक ’वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)