कामराच्या स्टुडिओची तोडफोड, अंजली दमानियांची एकनाथ शिंदेवर आगपाखड, म्हणाल्या "कामरावर सोडा आधी FIR शिंदेंच्या..."

    24-Mar-2025   
Total Views |

anjali damania on kunal kamra controversy
 
मुंबई : (Anjali Damania) स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यातच मुंबईतील खार येथील कुणालच्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत आपले परखड मत व्यक्त केले आहे.
 
दरम्यान, या तोडफोडीच्या प्रकरणाचे व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केले आहेत. तसेच “याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कुणाल कामरावर सोडा आधी एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
 
कामराविरोधात कायद्याने लढणे अपेक्षित
 
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कुणाल कामरा जे म्हणाला ते आवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे. मात्र, स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा आधी एफआयआर शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांवर दाखल करायला पाहिजे, हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा एकनाथ शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही." असं दमानिया यांनी म्हटले आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\