धर्मपथाचे वाहक 'धर्मनारायण' यांचे निधन

    24-Mar-2025   
Total Views |

VHP Dharmanarayan Sharma Passed Away

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Dharmanarayan Sharma Passed Away) 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय व्यवस्थापकीय समितीचे सदस्य धर्मनारायण शर्मा यांचे दि. २१ मार्च रोजी रात्री ८.४० च्या सुमारास निधन झाले. परिषदेचे केंद्रीय कार्यालय, संकट मोचन आश्रम, नवी दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. आपले आयुष्य आणि प्रत्येक श्वास हिंदुत्वासाठी समर्पित करणारे म्हणून त्यांची विशेष ओळख होती.

हे वाचलंत का? : मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय असंविधानिक

राजस्थानच्या उदयपूर येथे दि. २० जून १९४० रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे १९५९ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले. ते जयपूर आणि भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक होते. काही काळ अजमेर आणि जोधपूर विभागांचे विभाग प्रचारक होते. त्यानंतर १९८४ ते १९९४ पर्यंत महा कोशल प्रांताचे प्रांत प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९९५ ते २००० या काळात विश्व हिंदू परिषदेचे पूर्वांचलचे विभागीय संघटन मंत्री होते. २००० पासून ते विहिंपचे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. एकल मोहिमेत ३ वर्षे घालवल्यानंतर ते २०२४ पर्यंत विहिंपच्या धर्म प्रसार आयामचे केंद्रीय सह-प्रमुख राहिले.

धर्मनारायण यांनी हिंदू आचारसंहितेचा मसुदाही सध्याच्या हिंदू समाजाच्या गरजेनुसार तयार केला आहे. ते प्रभावी वक्ते आणि प्रमुख लेखकही होते. भारतीय धर्म, संस्कृती, ज्ञान-विज्ञान, महिला आणि युवा सबलीकरण अशा विविध विषयांवर त्यांनी दीड डझनहून अधिक पुस्तके आणि शेकडो लेख लिहिले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी ४ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी विहिंपच्या मध्यवर्ती कार्यालयात ठेवण्यात आले होते.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक