नाशकात गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

‘श्री काळाराम संस्थान’ आणि ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची बैठक

    24-Mar-2025
Total Views | 11
 
 Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages
 
नाशिक: ( Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages ) गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेबरोबरच नाशिककरांसाठी श्रद्धा, जल्लोष आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीराम रथ’ आणि ‘गरुड रथा’च्या मिरवणूक उत्सवासाठी ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची नुकतीच शौनकाश्रम, पंचवटी येथे बैठक पार पडली.
 
‘श्री काळाराम संस्थान’, मंदिर प्रशासनासह अहिल्याराम व्यायामशाळेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, मागील काही दिवसांपासून मिरवणुकीच्या रथाची सुरू असलेली डागडुजी पूर्ण झाली असून संस्थानचे विश्वस्त, मंदिराचे पुजारी आणि व्यायामशाळेच्या पदाधिकार्‍यांकडून रथाची तांत्रिक चाचणी केली जात आहे.
 
जवळपास अडीचशे वर्षांची परंपरा असलेले दोन्ही रथ रामनवमीनंतरच्या एकादशीला नाड्याने ओढले जातात. रथयात्रेपूर्वी राममंदिरातून मूर्ती व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. यात रामरथ भोगमूर्ती आणि गरुड रथात प्रभू श्रीरामांच्या पादुका आरतीने स्थापन केल्या जातात. त्यानंतर दरवर्षीचा मानकरी वर्ग रामरथाच्या प्रारंभीचा नारळ वाढवतो. दोन्ही रथांची आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरुवात करण्यात येते. बैठकीत रथ मिरवणुकीचा मार्ग, रस्त्याची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन, गरुड रथाचे परीक्षण, सजावट, सुरक्षा व्यवस्था, ब्रेक सिस्टीम, साऊंड सिस्टीम, रथसेवकांचा गणवेश, साफसफाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
 
श्रीराम रथ आणि श्री गरुड रथ मिरवणूक उत्सव संस्कृतीचा अभिमानाचा सोहळा असल्याने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’तर्फे नाशिककरांना करण्यात आले. यावेळी श्री अहिल्याराम व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि बलोपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
‘गरुड रथ’ नूतनीकरणाची वैशिष्ट्ये
 
रथाच्या लाकडी संरचनेची मजबुती व कोरीवकामांची दुरुस्ती, देवघराचे नूतनीकरण व सौंदर्यवर्धन, चाकांची मजबुती वाढवून सुरक्षितता आणि गतीमध्ये सुधारणा, पारंपरिक डिझाईन कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ‘श्री काळाराम मंदिर संस्थान’ आणि ट्रस्टचे विशेष सहकार्य, रथामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असलेली धुरीची संपूर्ण डागडुजी आणि नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण, गंज आणि झिजलेले भाग दुरुस्त करून बदल, उच्च प्रतिच्या धातूचा वापर, संतुलन आणि भार सहनशक्ती सुधारणा करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा