मुंबई: ( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
भाजप आ. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे पालघरवासीयांची व्यथा मांडली. “पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन जवळपास दहा वर्षे इतका कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई आणि गुजरातमधील खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जावे लागते. जिल्ह्यातील नंडोरे येथे 200 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेऊनही त्याचे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. अतिरिक्त निधी उपलब्ध न झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही,” अशी व्यथा आ. डावखरे यांनी मांडली.
ही बाब खरी असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कबूल केले आहे. “सद्यस्थितीत नंडोरे येथील 200 खाटांचे जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नसल्याने पालघर जिल्ह्यातील रुग्णांना नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये दाखल केले जाते,” असे ते म्हणाले. मात्र, पालघर जिल्ह्यात नऊ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि 46 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.
जुलैपर्यंत काम पूर्ण करणार : आरोग्यमंत्री
“सद्यस्थितीत नंडोरे येथील जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम 75 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, “मनोर येथे 200 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट तयार होत आहे. त्याचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकाम मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,” असे त्यांनी सांगितले.