आपल्या इच्छा मुलांवर लादू नका: डॉ. उदय निरगुडकर

कल्याणमध्ये ‘परीक्षेपलीकडचे विषय’यावर व्याख्यान संपन्न

    24-Mar-2025
Total Views |
 
Dont impose your wishes on your children Dr Uday Nirgudkar
 
 
कल्याण: ( Dont impose your wishes on your children Dr Uday Nirgudkar ) “आईवडिलांनी करिअर निवडताना आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत. आपल्या पाल्याला आपण जे क्षेत्र देतो, त्याचा आपल्याला किती अभ्यास आहे? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळा, क्लासला घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशी भावना पालकांनी ठेवू नये,” असे ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक डॉ. उदय निरगुडकर म्हणाले.
 
‘गुरूकुल एज्युकेशन चॅरिटेबल संस्थे’तर्फे कल्याणमधील सुभेदार वाडा शाळेच्या सभागृहात आयोजित ‘परीक्षेपलीकडचे विषय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी ‘परीक्षेपलीकडील विषय’ या संदर्भात जपानमधील अनेक उदाहरणे व्याख्यानातून दिली. या कार्यक्रमाचे दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि वेब पोर्टल ‘महाएमटीबी’ हे माध्यम प्रायोजक होते. “पालक आणि मुलांच्या नात्यात अंतर वाढत चालले आहे. आईवडील पैसे कमावण्यासाठी काय करीत आहेत? याची मुलांना जाणीव नाही आणि आपले मूल काय विचार करते आहे? याची पालकांना माहिती नाही.
 
अशा परिस्थितीत पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधत राहिले पाहिजे,” असा सल्ला डॉ. उदय निरगुडकर यांनी दिला. “यश प्राप्त करण्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची असते. शिस्तबद्ध नसाल, तर यश मिळणार नाही आणि मिळाले तरी ते फार काळ टिकत नाही,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
वैभव आणि भाग्यश्री ठाकरे यांच्या कामाचे कौतुक
 
पालघर जिल्ह्यातील वाडासारख्या ग्रामीण भागातून येऊन ‘गुरूकुल संस्थे’चे कार्य गेल्या 20 वर्षांहून अधिक वर्षे यशस्वीपणे करणार्‍या वैभव आणि त्यांची पत्नी भाग्यश्री ठाकरे यांचे निरगुडकर यांनी कौतुक केले.
 
‘फिनटेक’ या नव्या प्रणालीमुळे देशात प्रगती
 
‘अर्थ आणि तंत्रज्ञान’ ही दोन क्षेत्र एकत्र झाल्याने ‘फिनटेक’ या नव्या प्रणालीने आपल्या देशात मोठी प्रगती झाली. आपल्या या पद्धतीने प्रभावी होऊन फ्रान्स सरकारने आयफेल टॉवरच्या दर्शनाचे तिकीटही ‘भीम अ‍ॅप’वर देण्यास सुरुवात केल्याचा दाखला डॉ. निरगुडकर यांनी दिला. डॉ. निरगुडकर यांचे विचार ऐकल्याने विद्यार्थ्यांना करिअर निवडताना नक्कीच एक दिशा मिळेल, असा विश्वास वैभव ठाकरे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. वर्षा मेतर यांनी केेले.भाग्यश्री ठाकरे यांनी आभार मानले. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून राजेंद्र काळे, रोटरीअन डॉ. अवधूत शेट्ये, माजी प्राचार्य नारायण फडके, ‘रियल अ‍ॅकेडमी’चे अमोल पोतदार आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे रिजनल सेल्स हेड यशवंत मोर्ये उपस्थित होते.