मुंबई : ( Devendra Fadnavis on kunal kamra ) राज्याचे मानसिक स्वास्थ्य खराब करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, २४ मार्च रोजी विधानसभेत कुणाल कामराच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान दिले.
आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात कुणाल कामाराचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील या चर्चेत सहभाग घेतला होता.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हास्य किंवा व्यंग याचा पुरस्कार करणारे लोक आपण आहोत. एखादे राजकीय व्यंग झाले तरी आपण त्याला कधीही दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. आपण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मानणाऱ्यांमधील आहोत. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य होऊ शकणार नाही. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा पूर्व इतिहास बघितला तर प्रधानमंत्री, मुख्य न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था यासारख्या देशातील उच्च पदस्थ लोकांसंदर्भात खालच्या दर्जाचे बोलणे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीचे बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे. एक प्रकारे वादविवाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा या व्यक्तीला हव्यास आहे. या हव्यासातून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला.
२०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले, हे कामराला माहिती असायला हवे. हा काही महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली हे जनतेने ठरवले आहे. त्यानंतरही कुणी अशा प्रकारे सुपारी घेऊन काम करत असेल तर आश्चर्य वाटते."
विरोधकांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह
"आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात पण कुणी राज्यातील उच्चपदस्थ व्यक्तीवर खालच्या दर्जात बोलतो आणि समोरच्या बाकावरचे काही लोक त्याच्या समर्थनार्थ तत्काळ उभे राहतात. लगेच एकाचे ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते. हे कामराशी ठरवून चालले आहे की, त्याला तुम्हीच सुपारी दिली असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे," असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
"राहुल गांधी जे लाल संविधानाचा फोटो घेऊन फिरतात त्या संविधानाचा फोटो घेऊन कामराने ट्विट केले आहे. तुम्ही संविधान वाचले असते तर अशा प्रकारे स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले असून ते अबाधित आणि अमर्याद आहे. पण ज्याक्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्याक्षणी ते स्वातंत्र्य मर्यादित होते. त्यामुळे अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन कुणी अपमानित करत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही मंडळी महाराष्ट्राचे मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचे काम करत असून आम्ही हे सहन करणार नाही. हे जे लेफ्ट लिबरल किंवा अर्बन नक्षल विचार तयार झालेत त्यांचा उद्देश समाजातील मानकांना आणि देशातील संस्थांना अपमानित करणे, या संस्थांवरून लोकांचा विश्वास उडावा असे वक्तव्य करणे हाच त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे असे काम करणाऱ्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.