धर्मांध फहीमच्या घरावर फिरवला बुलडोझर!

24 Mar 2025 13:31:08

Buldozer Action on Fahim Khan House

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Buldozer Action on Fahim Khan House) 
औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी हैदोस घातला. या हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर प्रकरणातील कारवाईला आणखी वेग आला आहे. फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने सोमवारी (दि. २४ मार्च) बुलडोझर फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने २४ तासांचा अवधी दिला होता, त्यानंतर सदर कारवाई झाल्याचे समोर येत आहे.

महापालिकेच्या मते ८६.४८ चौरस मीटरवर बांधलेले हे घर बेकायदेशीर आहे, ज्याचा नकाशा मंजूर झालेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली असता सदर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागपुरातील संजय बाग कॉलनीत असलेल्या फहीम खान यांच्या पत्नी जहिरुन्निसा यांच्या नावावर असलेल्या दुमजली घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.



कायद्याने परवानगी दिल्यास प्रशासन बुलडोझर चालवण्यास मागे हटणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर मॉडेलबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ११२ जणांना अटक करण्यात आली असून सदर हिंसाचारात पोलिस उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी आणि ३३ पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे.

Powered By Sangraha 9.0