मुंबई: ( Aurangzeb UBT new GOD sanjay nirupam on UBT ) “औरंगजेब हे आता उबाठा गटाचे नवे आराध्य दैवत बनले आहे,” अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. रविवार, 23 मार्च रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय निरुपम म्हणाले की, “नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण करणार्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. लवकरच मातोश्रीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल. संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगलखोरांची खूप काळजी वाटते. मुस्लीम मतांसाठी मुल्ला संजय राऊत हिंदूविरोधी भूमिका घेत आहेत. नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे.
त्यांची मालमत्ता विकून शासनाने नुकसान भरपाई वसूल करावी. नागपूर शहरातील संशयित दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 104 संशयितांना अटक झाली आहे. काल अटक झालेला सोशल मीडिया इन्फ्लुअर्स हा ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेशी संबंधित आहेत. यापूर्वी मोमीनपुरात काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या.
मुस्लीम मतांसाठी उबाठा गट या संशयित लोकांची पाठराखण करत आहेत. यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे मुस्लीमधार्जिणी भूमिका घेऊन हिंदू लोकांची बदनामी करत आहेत,” अशी टीका संजय निरुपम यांनी केली.