आरोग्य भारती प्रांत कार्यकारिणी वार्षिक नियोजन बैठक संपन्न

    24-Mar-2025   
Total Views |

Arodya Bharati Varshik Niyojan Baithak

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Arodya Bharati Varshik Niyojan Baithak)
आरोग्य भारती कोकण प्रांताची प्रांत कार्यकारिणी वार्षिक नियोजन बैठक रविवार दि. २३ मार्च रोजी यशवंत भवन, लोअर परळ येथे पार पडली. प्रांत स्तरावरील सर्व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. एकूण चार सत्रांमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उद्घाटन सत्राला अखिल भारतीय सुप्रजा आयाम प्रमुख डॉ. मधुरा कुलकर्णी व पश्चिम क्षेत्र संरक्षक डॉ. मुकेश कस्बेकर उपस्थित होते.

हे वाचलंत का? : मत्स्य व्यवसायाला 'कृषी'चा दर्जा देणार! - मंत्री नितेश राणे

पहिल्या सत्रात मागील वर्षाचा आढावा घेण्यात आला व कार्यक्रमांचा वृत्तांत सर्व कार्यकर्त्यांनी कथन केला. पुढील सत्रात वार्षिक नियोजन करण्यात आले. विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम, स्वस्थ वस्ती-स्वस्थ ग्राम, आरोग्य मित्र-परंपरागत चिकित्सक कार्य, घरेलू उपचार-महिला कार्य, वनौषधी प्रचार-प्रसार, आयाम प्रचार-प्रसार या ६ प्रमुख आयामांवर कार्य करताना अधिक कार्यकर्ते आरोग्य भारतीला कसे जोडण्यात येतील या बद्दल चर्चा झाली. तसेच विश्व योग दिवस व धन्वंतरी जयंती हे अनिवार्य कार्यक्रम अधिक स्थानांवर व अधिक उपस्थितीत करण्यात यावे, समाजात आरोग्य भारतीचे कार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सर्वांनी संकल्प केला.

भोजनोत्तर सत्रात आरोग्य भारतीचे विभाग कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. तृतीय सत्रात पर्यावरण गतिविधी कोकण प्रांत संयोजक अभिजीत देशपांडे यांनी जल- पर्यावरण विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. पेड, पौधा, पॉलिथिन या विषयावर बोलताना त्यांनी समाजाचे मानस परिवर्तन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. आरोग्य भारतीचा पर्यावरण आयाम व पर्यावरण गतिविधी यांनी समन्वयाने वृक्षारोपण करण्याचा संकल्प ही केला.

चतुर्थ सत्रात मुकेश वोरा यांनी व्यसनमुक्ती या विषयावर कार्यकर्त्यांना उद्बोधन केले. एक व्यक्ती व्यसनात कसा अडकला जातो, तो कसा व्यसनाच्या अधीन होतो हे सांगून त्याचे पूर्णपणे निर्मूलन करायचे असेल तर सुरुवात करताना च प्रतिबंधन करावे याचे प्रतिपादन केले. व्यसन हा एक व्याधी च असून तो टाळण्यासाठी प्रबोधन करणे सुद्धा जरूरी आहे हे त्यांनी सांगितले.

समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगर कार्यवाह संजय नगरकर उपस्थित होते. वर्षभराची एक कार्यपद्धती ठरवून त्याप्रमाणे योग्य नियोजन केल्यास आपले विचार आपल्याला समाजात स्पष्टपणे मांडता येतात, असे ते म्हणाले. तसेच पंचपरिवर्तनाचे पाच विषय स्वतः मध्ये अंगीकारावे व नंतर ते समाजात नियोजनबद्ध पद्धतीने घेऊन जावेत आणि जीवनातील अधिक वेळ हा सामाजिक कार्यासाठी द्यावा, याबाबत त्यांनी आवाहन केले. व्यवस्थित नियोजन करून कोकण प्रांतात काम वाढवण्याचा व समाजासाठी अधिक वेळ देण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी केला.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक