मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूमागे कोणीही जबाबदार नसून त्याने आत्महत्याच केली आहे, असा निष्कर्ष सीबीआयच्या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सीबीआयने याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लोजर रिपोर्ट दाखल केले आहेत. सुशांत सिंगचे वडील केके सिंग यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत एक याचिका दाखल केली होती. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने राजपूत कुटुंबियांविरुद्ध खटला दाखल केला होता. सीबीआयने या दोन्ही खटल्यांचा रिपोर्ट सादर केला आहे.
हे वाचलंत का? - पंजाबमधील जिल्हाप्रमुखाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात
सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या प्रकरणात सीबीआयने पाटणा येथील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, तर दुसऱ्या प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सीबीआयच्या रिपोर्टमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही, कुणीही त्याचा गळा आवळला नाही. तसेच त्याच्यावर कुणी विषप्रयोगही केलेला नाही. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली असल्याचे या क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.