मनसेच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल! संदीप देशपांडे मुंबईचे शहराध्यक्ष तर अमित ठाकरे...

23 Mar 2025 12:49:46
 
MNS
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले असून संदीप देशपांडेंवर मुंबई शहराध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रविवार, २३ मार्च रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
 
याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले की, "मुंबईमध्ये नव्याने आम्ही काही पद रचना केल्या असून त्यात पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष पद दिले आहे. आतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होते. आता तीन उपशहर अध्यक्ष आणि एक शहर अध्यक्ष नियुक्त केले आहेत. संदीप देशपांडे यांचे नाव शहर अध्यक्षपदासाठी घोषित केले आहे. कुलाबा ते माहिम आणि कुलाबा ते शीव या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पश्चिमेकडच्या भागात कुणाल माईनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच पूर्वेकडच्या भागाची योगेश सांवत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या चौकटीत आणि कसे काम करायचे या सगळ्या गोष्टी २ तारखेला लेखी स्वरूपात दिल्या जातील," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्याचा कायदा तयार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
मुंबई आणि ठाण्यात केंद्रीय समिती
 
"तसेच एक केंद्रीय समितीदेखील आम्ही नेमली असून ती या प्रत्येक घटकाकडे लक्ष ठेवून त्यांच्याशी संवाद साधेल. यासाठी बाळा नांदगावकर यांच्याकडे गटाध्यक्ष, नितीन सरदेसाई यांना विभाग अध्यक्ष तर अमित ठाकरे यांना शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या यादीत आणखी बरेच लोक आहेत. त्याप्रमाणेच ठाण्यातही एक केंद्रीय समिती गठित केली आहे. यात अविनाश जाधव, अनिकेत पानसे, राजू पाटील, गजानन काळे यांच्यासह वेगवेगळे लोक काम बघतील. पहिल्यांदा मुंबई आणि ठाण्यात ही रचना केली असून यानंतर एप्रिल-मे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना करण्यात येणार आहे," असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0