मुंबई : परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या घटनेची तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवार, २२ मार्च रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले.
वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना घडली. यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.
अनुभवी अधिकाऱ्यांची नियूक्ती करा
या प्रकरणाचा तातडीने आणि निष्पक्षपणे तपास होण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. आरोपीला कोणतेही पाठबळ मिळणार नाही याची काळजी घ्यावी. आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले असल्यास त्याचा तपास करून पुरावे गोळा करावे. तसेच विद्यार्थिनींवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात कठोर पावले उचलली जातील आणि दोषींना कडक शिक्षा होईल, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहे.