पंजाबमधील जिल्हाप्रमुखाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात
अमृतसर येथील मंगा कुटूंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत
23-Mar-2025
Total Views |
पंजाब (मोगा) : शिवसेनेचे पंजाब राज्याचे जिल्हाप्रमुख दिवंगत मंगतराम मंगा यांच्या कुटुंबियांना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यावतीने १० लाखांची मदत करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी अमृतसरमधील मोगा येथील निवासस्थानी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
पंजाब राज्यातील मोगा तालुक्यात खलिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून मंगतराम मंगा यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मोगा-फिरोजपुर हायवे बंद करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी मंगा कुटूंबियांची आणि स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच पक्षाच्या वतीने कुटुंबाला १० लाखांची मदत आणि मंगा यांच्या पत्नीला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नोकरी देण्याचे पत्र त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द केले.